७५ वर्षीय आजोबांच्या पायाच्या तळव्यात घुसली विठ्ठल मूर्ती, सिव्हिल रुग्णालयात शस्त्रक्रिया; डॉक्टरांना यश

जखम भरल्यानंतर चार महिने झाल्यावरही पाय दुखणे आणि सुजणे सुरू होते. डॉक्टरांनी एमआरआय केल्यावर तळव्यात लोखंडी पट्टी सारखे काहीतरी असल्याचे समोर आले. पण, शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या पायाच्या तळव्यात लोखंडाची पट्टी नव्हे तर चक्क विठ्ठलाची मूर्ती असल्याचे...
७५ वर्षीय आजोबांच्या पायाच्या तळव्यात घुसली विठ्ठल मूर्ती, सिव्हिल रुग्णालयात शस्त्रक्रिया; डॉक्टरांना यश

ठाणे : देवघरात साफसफाई करताना एका ७५ वर्षीय आजोबा स्टुलावरून खाली पडले. त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काही तरी घुसल्याने जखम झाली. ती जखम भरल्यानंतर चार महिने झाल्यावरही पाय दुखणे आणि सुजणे सुरू राहिल्याने डॉक्टरांनी एमआरआय केल्यावर तळव्यात लोखंडी पट्टी सारखे काहीतरी असल्याचे समोर आले. मंगळवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या पायाच्या तळव्यातून लोखंडाची पट्टी नव्हे तर चक्क विठ्ठलाची मूर्ती असल्याचे बाहेर काढली. ती मूर्ती जवळपास साडेतीन सेंटीमीटर इतकी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मुलुंड पश्चिम येथे राहणारे ७५ वर्षीय आजोबा हे चार महिन्यांपूर्वी घरातील देवघराची साफसफाई करत होते. साफसफाई करताना वस्तू इकडे तिकडे पसरल्या होत्या. याचदरम्यान अचानक ते स्टुलावरून खाली पडले, त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळाव्यात काही तरी घुसल्याने त्यांच्या पायाला जखम झाली होती. ती जखम पूर्णपणे बरे झाल्यानंतर देखील पाय दुखत होता. तसेच पायातून पाणी येत असल्याने त्यांनी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. दुखणे आणि सूजने नेमके काय भानगड आहे हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या पायाचा पहिला एमआरआय काढला त्यावेळी तो नॉर्मल आला होता. पण, पुन्हा दुसऱ्यांदा एमआरआय काढल्यानंतर काहीतरी असल्याचे त्यामध्ये स्पष्ट झाले. म्हणून ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थोपेडीक सर्जन डॉ. विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या ७५ वर्षीय आजोबांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली, जवळपास अर्धा तास ती शस्त्रक्रिया चालली. या यशस्वी शस्त्रक्रियेत आजोबांच्या पायाच्या तळपायातून ती वस्तू बाहेर काढल्यावर ती लोखंडाची पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

गेल्या काही महिन्यांपासून पायाचा तळवा दुखत आणि सुजत असल्याने संबंधित रुग्णाच्या पायाची योग्य तपासणी केली. एमआरआयमध्ये काही तरी वस्तू घुसल्याचे समोर आल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तसेच शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून संबंधित रुग्णाला लवकरच घरी सोडण्यात येईल. - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक

logo
marathi.freepressjournal.in