

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील डॉमिनोज पिझ्झाच्या तीन आउटलेटचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. मुंबईतील विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील शाखांचा यात समावेश आहे. याशिवाय कराड येथील डॉमिनोजच्या एका आउटलेटवरही कारवाई करण्यात आली आहे.
ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडकडून या शाखा चालवल्या जातात. त्यांमध्ये स्वच्छता, अन्नसाठवणूक आणि दैनंदिन कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या.
घाटकोपर पश्चिम येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील आर-सिटी मॉलमधील डॉमिनोज शाखेत सर्वाधिक त्रुटी आढळल्या. तपासणीदरम्यान या ठिकाणी किड्यांचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले. तसेच प्रभावी कीटकनियंत्रण व्यवस्था आणि त्यासंबंधी आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले.
विलेपार्ले पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील डी.जे. रोड कॉर्नरजवळील दुकान क्रमांक ६, ८ आणि १० येथे असलेल्या डॉमिनोज शाखेचा परवानाही निलंबित करण्यात आला.
बोरिवली पश्चिम येथील वीर सावरकर रोडवरील, आयसी कॉलनीतील सेंट फ्रान्सिस स्कूल ग्राउंडजवळील दुकान क्रमांक १४च्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील डॉमिनोज शाखेवरही अन्नसुरक्षा नियमांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करण्यात आली.
घाटकोपरच्या शाखेत अन्नसाठवणुकीसाठी योग्य पद्धतींचे पालन केले जात नव्हते. अन्नपदार्थांसाठी आवश्यक तापमान नियंत्रणही योग्य प्रकारे केले जात नव्हते. स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी पुरेशा सुविधा नसून नियमित स्वच्छतेचे निश्चित वेळापत्रकही उपलब्ध नव्हते.
तपासणीदरम्यान आर-सिटी मॉल शाखेला अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या साहित्याचे फूड-ग्रेड प्रमाणपत्र आणि इतर अनिवार्य कागदपत्रे सादर करता आली नाहीत. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेचे पुरावे, वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे, परवाने तसेच हातमोजे आणि एप्रन यांसारख्या सुरक्षात्मक साधनांच्या वापरासंबंधी नोंदीही उपलब्ध नव्हत्या.
याशिवाय नियमित अन्न व पाणी तपासणी अहवाल, उपकरणांच्या कॅलिब्रेशनची नोंद, प्रतिबंधात्मक देखभालीचे रेकॉर्ड आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा असल्याचेही दाखवता आले नाही.