डॉन दाऊद इब्राहिम दरमहा १० लाख रुपये नातेवाईकांना पाठवत ; ईडी

डॉन दाऊद इब्राहिम दरमहा १० लाख रुपये नातेवाईकांना पाठवत ; ईडी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम दरमहा १० लाख रुपये इक्बाल कासकर आणि त्याच्या इतर भावंडांना आणि नातेवाईकांना पाठवत असे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्धच्या मनी लाँड्रिंग खटल्यातील एक साक्षीदार खालिद उस्मान शेख याने ईडीला दिली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. खालिद उस्मान हा शेख इक्बाल कासकरचा बालपणीचा मित्र अब्दुल समद याचा धाकटा भाऊ आहे. अब्दुल समदचा मृत्यू झाला आहे. १९९०मध्ये दाऊद आणि अरुण गवळी यांच्यातील गँगवॉरमध्ये अब्दुल समद मारला गेला होता. इक्बाल कासकर आणि अब्दुल समद दाऊदच्या टोळीत काम करायचे. उस्मान खालिद शेखनेही गँगवॉरमध्ये आपल्या भावाचा मृत्यू झाल्याची माहिती ईडीला दिली आहे.

उस्मान खालिद शेखने सांगितले की, माझ्या भावाचा मृत्यू झाला तेव्हा इक्बाल कासकर दुबईत होता. यानंतर तो भारतात आल्यावर माझ्या आईला भेटायला घरी आला आणि त्यांनी शोक व्यक्त केला. यानंतर इक्बालने मला आणि माझा भाऊ शब्बीर उस्मान याला त्याच्या घरी बोलावले आणि आम्हाला त्याला भेटायला जावे लागले. शब्बीर उस्मान सध्या ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे.

गुंडामार्फत पाठवायचा पैसे

आम्ही इक्बालला त्याच्या घरी भेटायला जायचो तेव्हा तो आम्हाला घरी जेवू घालायचा आणि तासभर बोलून परत पाठवायचा. त्याचवेळी दाऊद आपल्या भावंडांना, नातेवाईकांना आणि गुंडांना दर महिन्याला १०लाख पाठवतो, असे इक्बालने सांगितले होते. दाऊद हे सर्व पैसे त्याच्या गुंडांमार्फत पाठवतो, यावेळी इक्बाल कासकरने मला सांगितले की, दाऊद त्यालाही दर महिन्याला १० लाख रुपये देतो.

दाऊदच्या नावावर व्हायची वसुली

खालिद उस्मानने ईडीला सांगितले की, ‘दाऊदला सलीम पटेल त्याच्या नावाने ओळखत होता. तो आपला शेजारी असल्याचे सलीमने सांगितले. सलीम हा दाऊद आणि इक्बाल कासकर यांची बहीण हसीना पारकर, जी आता मरण पावली आहे तिचा ड्रायव्हर होता. सलीम पटेल हा हसिना पारकरची वसुली आणि जमिनीचा वाद मिटवण्याचे काम करत असे. हसीना पारकरने पैसे कमावण्यासाठी दाऊदच्या नावाचा वापर केला. सलीम आणि हसीना यांनी मिळून मुंबईतील वांद्रे येथे अशाच एका फ्लॅटवर जबरदस्तीने कब्जा केल्याचे त्याने सांगितले. दाऊदच्या नावाचा वापर खंडणी आणि जमीन हडपण्यासाठी करण्यात आल्याचे खुद्द सलीमने मला सांगितले होते’.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in