मुंबई : दिवाळीत फटाके फोडल्याने प्रदूषणात वाढ तर होतेच फटाक्यांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ निश्चित केली आहे. फटाक्यांमुळे घडणाऱ्या घटना टाळण्यासाठी हवेत उडणारे, इमारत, पडद्याजवळ दिवे पणत्या लावू नये, जिन्यावर फटाके फोडू नये, अशी नियमावली मुंबई अग्निशमन दलाने जारी केली आहे. तसेच फटाके फोडण्याबाबत काय काळजी खबरदारी घ्यावी, याबाबत मुंबईकरांमध्ये विशेष करून झोपडपट्टीत जनजागृती मोहीम राबवण्यात येत असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्नी सुरक्षा बाबत अग्निशमन दलाचे सहाय्यक व वरिष्ठ केंद्र अधिकारी मुंबईकरांमध्ये जनजागृती मोहीम राबवत असून, आतापर्यंत १६७ ठिकाणी जनजागृती मोहीम राबवण्यात आल्याचे रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले. दरम्यान, ही जनजागृती मोहीम पुढेही दिवाळीपर्यंत सुरू राहिल असे ही ते म्हणाले.
'अशी' आहे नियमावली
फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत.
फटाके मुलांपासून लांब ठेवावेत.
फटाके फोडताना पादत्राणे वापरावीत.
खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या, दिवे लावू नयेत.
पार्किंग, गॅसलाइन, विजेच्या तारांजवळ फटाके लावू नयेत.
रोषणाईसाठी ओव्हरलोड तारांची जोडणी करू नये.