खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी जीव पणाला लावू नका! जरांगे-पाटलांनी उपोषण तत्काळ थांबवण्याचे राज ठाकरेंचे आवाहन

तुमचे उपोषण तुम्ही तत्काळ थांबवा, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना केली आहे.
खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी जीव पणाला लावू नका! जरांगे-पाटलांनी उपोषण तत्काळ थांबवण्याचे राज ठाकरेंचे आवाहन
Published on

मुंबई : इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवे आहे. ते एकदा मिळाले की, हे आपली सगळी आश्वासने विसरणार, अशी यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात, त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणे योग्य नाही. त्यामुळे तुमचे उपोषण तुम्ही तत्काळ थांबवा, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना केली आहे.

राज ठाकरे यांनी जरांगे-पाटील यांना ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पत्र लिहिले आहे. “राज्य सरकारसाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नका. महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश किंवा बिहार व्हायला वेळ लागणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

“आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. अशा प्रश्नांना हात घालण्याची राजकीय मंडळींची इच्छा नाही, असे मी मागे म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची, हेच त्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणाने त्यांना मतदान करतो. आपल्या मतदानाचा यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठूर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली, या गोष्टींनी यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही जीव पणाला लावू नका,” असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

तरुणांच्या आत्महत्या क्लेशदायक -राज

“आरक्षणासाठी आता गावागावातील तरुण आत्महत्या करत आहेत, हे तर फारच क्लेषदायक आहे. या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणे अत्यंत वाईट आहे. तसेच याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का विद्वेषानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही,” असेही राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा

संविधानाच्या पानांत, संसद आणि विधानसभेच्या सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नांची उत्तरे आहेत. मी या पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतो की, त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचे ‘विशेष अधिवेशन’ भरवावे. सरकार कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे, हे एकदा सगळ्यांना कळू दे. या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा,” असे राज ठाकरे यांनी सुचवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in