आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,राज ठाकरे

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,राज ठाकरे

‘सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उध्दव ठाकरे, तुम्हीही नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष आता टिपेला पोचला असून, मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून सध्या धरपकड सुरु आहे. यावरून राज ठाकरे राज्य सरकारवर कमालीचे संतापले असून संतापाच्या भरात त्यांनी राज्य सरकारला खरमरीत पत्रच लिहिले आहे. मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ४ मे पर्यंतचा अल्टीमेटम देत राज्याच्या कायदा सुव्यवस्थेलाही एक प्रकारे आव्हान दिले होते. त्यानंतर राज्यात शांतता राखण्यासाठी गृह विभागाने मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली होती आणि अजून ती सुरूच असल्याने राज ठाकरे यांनी तक्रार, संताप आणि इशारा देणारे पत्रच लिहित मन मोकळे केले आहे.

मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी १७ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे संदीप देशपांडेंसह इतर कार्यकर्त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बचावासाठी राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले आहेच तसेच सत्तेत कोणी कायमस्वरुपी नसते, याची आठवण करुन दिली आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मोहिम हातात घेतल्यानंतर राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत असल्याचा टोलाही राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला हाणला आहे. ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी भोंगे उतरवा आंदोलन सुरु केले; मात्र त्यापुर्वीच ८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत, अनेकांना अटक केली आहे. कार्यकर्त्यांना दडपण्यासाठी राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in