प्रसिद्धीसाठी जनहित याचिकेचा वापर करू नका, हायकोर्टाने खडसावले; याचिकाकर्त्यांने याचिकाच मागे घेतली

मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत तंबाखू आणि गुटख्याची जाहिरात करणाऱ्या काही कलाकारांना नोटीस बजावली होती; मात्र सुनावणी दरम्यान या कलाकारांनी याचिकेत नमूद केलेले एकही कृत्य केले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर खंडपीठाने संताप व्यक्त केला.
प्रसिद्धीसाठी जनहित याचिकेचा वापर करू नका, हायकोर्टाने खडसावले; याचिकाकर्त्यांने याचिकाच मागे घेतली

मुंबई : तंबाखू आणि गुटख्यावरील जाहिरातींविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांलाच उच्च न्यायालयाने चांगलेच खडेबोल सुनावले.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्याय मूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने जनहित याचिका दाखल करताना त्याचे पावित्र्य राखा, त्याचा गैरवापर करून नका. एखादा मुद्दा उपस्थित करताना सखोल अभ्यास करा. केवळ प्रसिद्धीसाठी जनहित याचिकेचा वापर करू नका, अशा शब्दांत कानउघाडणी करत याचिका फेटाळण्याचे संकेत दिले, अखेर याचिकाकर्त्यांने याचिकाच मागे घेतली.

तंबाखू आणि गुटख्याची जाहिरात करणाऱ्या काही कलाकारांविरोधात कारवाईची मागणी करत यश फाऊंडेशनच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत तंबाखू आणि गुटख्याची जाहिरात करणाऱ्या काही कलाकारांना नोटीस बजावली होती; मात्र सुनावणी दरम्यान या कलाकारांनी याचिकेत नमूद केलेले एकही कृत्य केले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर खंडपीठाने संताप व्यक्त केला.

याचिकाकर्त्यांना खडे बोल

याचिकेत आरोप करण्यात आलेल्या कलाकारांचा काहीही संबंध नसताना त्यांना यात नाहक गोवण्याचा प्रयत्न केला. याचिका दाखल करताना कोणताही कायदेशीर आधार न घेता केवळ प्रसिध्दीसाठी याचिका केल्याचा ठपका ठेवत याचिकाकर्त्यांला चांगलेच धारेवर धरले. तसेच जनहित याचिका एक साधन म्हणून गैरवापर करू नका, याचिका करताना त्यात उपस्थित केलेल्या मुद्याचा योग्य अभ्यास करून युक्तीवाद करा, असे खडेबोल सुनावताना खंडपीठाने याचिका फेटाळण्याचे संकेत दिल्यानंतर याचिकाकर्त्याच्या संस्थेने याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली, ती खंडपीठाने मान्य केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in