
दररोज लाखो महिला कामानिमित्त रेल्वेतून प्रवास करतात. पण, या महिलांच्या मूलभूत नैसर्गिक गरजेकडे रेल्वेचे साफ दुर्लक्ष दिसत आहे. रेल्वे स्थानकांवरील ‘टॉयलेट’ हे अस्वच्छ व घाणेरडे असते, अशी तीव्र प्रतिक्रिया ८३ टक्के महिला प्रवाशांनी व्यक्त केली आहे. या ‘टॉयलेट’ची अवस्था सुधारणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत महिलांनी व्यक्त केले.
प्रा. अवकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या बी. ए.च्या पहिल्यावर्षीच्या विद्यार्थिनींनी ऑगस्ट व सप्टेंबर दरम्यान हे सर्व्हेक्षण केले. वेगवेगळ्या वयोगटातील हजार महिलांनी या सर्व्हेक्षणात सहभाग घेतला. सीएसएमटी, चर्चगेट, मरीन लाईन्स, वडाळा रोड, गोरेगाव, वसई, मुंबई सेंट्रल, मालाडसह २१ रेल्वे स्थानकांवरील ‘टॉयलेट’चे सर्व्हेक्षण करण्यात आले.
या टॉयलेट्सची अवस्था पाहून ५० टक्के महिला या त्याचा वापरही करत नसल्याचे आढळले आहे. महिला प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत ९७ टक्के महिलांनी नापसंती व्यक्त केली, असे अवकाश जाधव यांनी सांगितले.
टॉयलेट’च्या दर्जाबाबत तक्रारी
टॉयलेटमध्ये बादली, मग व पाणी नसणे अशी तक्रार ५० टक्के महिलांनी केली. या टॉयलेटच्या दुरवस्थेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याची माहिती काही महिलांनी दिली. ७३.४ टक्के महिला प्रवाशांनी सांगितले की, फलाटावरील टॉयलेटमध्ये स्वच्छता ठेवली जात नाही. तर ८.५ टक्के महिलांनी स्वच्छता ठेवली जात असल्याचे सांगितले.
फलाटावरील ‘टॉयलेट’ तुम्ही नियमीत वापरता का, यावर ३० टक्के महिला प्रवाशांनी ‘होकारार्थी’ उत्तर दिले. तर २१.८ टक्के महिलांनी कधी तरी वापरत असल्याचे सांगितले तर ५० टक्के महिलांनी आपण फलाटांवरील ‘टॉयलेट’ वापरत नसल्याचे सांगितले. ‘टॉयलेट’ स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही अधिक पैसे मोजाल का? यावर ४३.९ टक्के महिलांनी होकार दिला. तर ४०.८ टक्के महिलांनी ‘देऊ शकतो’ असे उत्तर दिले. तर १५.३ टक्के महिलांनी अधिक पैसे देण्यास तयार नसल्याचे सांगितले. महिलांना फलाटावर स्वच्छ ‘टॉयलेट’ पुरवणे ही रेल्वेची जबाबदारी असल्याचे मत ९१.५ टक्के महिलांनी सांगितले.
महिला प्रवाशांच्या मागण्या
कचरा पेट्या व टिश्यू पेपर वाढवावेत
सर्व स्टेशन्सवर सॅनिटरी पॅडस् ठेवावेत
टॉयलेटजवळ लाईट व साईन बोर्ड असावेत
सुरक्षा वाढवावी
कपडे बदलण्याची रुम, स्तनपान रुम असावी
सीएसआर फंडातून सुविधा देण्यात याव्यात
चांगले दरवाजे, टॉयलेट रोल्स, आरसे, हँड ड्रायर, एअर प्युरिफायर आदी सुविधा द्याव्यात