गणेशमूर्तींवर खुणा नकोच! मूर्तिकार, मंडळांसह भक्तांचा विरोध; पालिका प्रशासनाकडून अखेर निर्णय रद्द

मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे
गणेशमूर्तींवर खुणा नकोच! मूर्तिकार, मंडळांसह भक्तांचा विरोध; पालिका प्रशासनाकडून अखेर निर्णय रद्द
Published on

मुंबई : गणेशमूर्ती शाडूची की पीओपीची, याची खात्री पटावी, यासाठी मूर्तीच्या मागील बाजूस हिरव्या किंवा लाल रंगाचे वर्तुळ करण्याच्या पालिकेच्या या निर्णयाला गणेश मूर्तिकारांनी तीव्र विरोध केला. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही हा निर्णय आस्थेला धोका निर्माण करणारा ठरू शकतो. त्यामुळे मूर्ती कुठली यासाठी दुसरा पर्याय शोधा, असे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पालिका प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांचे निर्देश, मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा विरोध लक्षात घेता, पालिका प्रशासनाने अखेर हा निर्णय रद्द केल्याचे सोमवारी स्पष्ट केले.

गणेशोत्सव हा आस्थेचा विषय आहे. मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्ती गणेशाच्या मूर्तीला पवित्र मानून त्याची मनोभावे पूजा करतो. त्यामुळे उत्सव काळात कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही, याची बारकाईने काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींवर शिक्का मारणे किवा रंग देणे योग्य नाही. यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा, यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधण्याबाबत महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा केली असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मूर्तीवर खूण करण्याचा निर्णय याआधीच पालिका प्रशासनाकडून घेतल्याचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले. मात्र याबाबत प्रसिद्धी झाली नसल्याने भाविकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. म्हणून या निर्णयाला मूर्तिकारांकडूनही विरोध करण्यात आला होता.

भावना दुखावू शकतात -दहिबावकर

गणेशमूर्ती पूजन हा भाविकांच्या आस्थेचा विषय असल्यामुळे पूजन होणाऱ्या सात्त्विक मूर्तींवर खूण करणे किंवा शिक्का मारल्यास हिंदूंच्या भावना दुखावू शकतात. त्यामुळे शिक्का मारण्याची अट योग्य नाही.

- नरेश दहिबावकर, अध्यक्ष, समन्वय समिती

logo
marathi.freepressjournal.in