सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी दरवाजे उघडे - दिपक केसरकर

मुंबई पालिकेत आता शिवसेना शिंदे गट सक्रीय ; जनतेने मांडल्या समस्या
सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी दरवाजे उघडे - दिपक केसरकर

मुंबई : पालकमंत्री जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच असतो. पालकमंत्री म्हणून कोणी, कुठल्या पक्षाचे नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या घेऊन आले तर त्या समस्यांचे निवारण करण्यात येईल, अशी ग्वाही मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मुंबई महापालिका मुख्यालयात केसरकर यांना दालन उपलब्ध करण्यात आले असून बुधवारी पहिल्या दिवशी जनतेच्या विविध समस्या जाणून घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. ठाण्यात वर्चस्व प्रस्थापित केलेले एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष पालिकेत सक्रिय झाला आहे.

मुख्यमंत्री पदाच्या खर्चीवरुन ठाकरे व भाजप मध्ये वाद झाला आणि आज दोन मित्र पक्ष राजकीय शत्रु झाले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली आहे. भाजपचे आमदार व उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना मुख्यालयात कार्यालय उपलब्ध झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार व शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनाही मुख्यालयात दालन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सक्रिय झाली आहे.

महापालिकेतही शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू

शिवसेना (शिंदे गट) पक्षात आतापर्यंत राज्यभरातील कार्यकर्ते, माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. अजूनही इनकमिंग सुरू आहे. आता तर मुंबई महापालिकेतही शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू झाले आहे. ठाकरे गटातून आतापर्यंत ३३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटही पालिकेत सक्रीय होण्यास सुरुवात केली आहे.

दर बुधवारी नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

भाजप नेते, उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालिका मुख्यालय़ात संपर्क कार्यालय सुरू केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही बुधवारपासून मुख्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नागरिकांशी संवाद सुरू केला आहे. प्रत्येक बुधवारी नागरिकांसोबत संवाद साधला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in