
कोरोनाचा उपप्रकार ओमायक्राॅन विषाणू अजूनही दबा धरून बसला असताना पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत आहे. ११ ते १८ सप्टेंबरपर्यंत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत आठ दिवसांत दुपटीने वाढ झाल्याने मुंबईत पावसाळी आजारांचा धोका कायम आहे; मात्र स्वाईन फ्लू व चिकनगुनिया आटोक्यात आल्याने मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
मुंबईत वेगाने वाढणारा स्वाईन फ्लू पूर्ण आटोक्यात आला असला, तरी डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या मात्र दुपटीने वाढली आहे. गेल्या आठवडाभरात डेंग्यूचे ५९ रुग्ण आढळले असून मलेरियाचे तब्बल १९१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सप्टेंबरमधील मलेरिया रुग्णांची संख्या ३९८ तर डेंग्यू रुग्णसंख्या १३९ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घर परिसर स्वच्छ ठेवावा आणि काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून बसलेला कोरोना आता पूर्ण आटोक्यात आला आहे; मात्र पावसाळी आजार वाढत असल्याचे समोर आले आहे. यावर्षी पावसाळी आजारांमुळे ऑगस्टपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लेप्टो-मलेरियामुळे प्रत्येकी १ आणि डेंग्यू- स्वाईन फ्लू मुळे प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे ताप, कफ, घशात इन्फेक्शन, शरीर जखडणे, डोकेदुखी, अतिसार, उलटी अशी लक्षणे आढळल्यास वाढणारा प्रसार रोखण्यासाठी तातडीने डॉक्टरांजी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळी आजारांसाठी पालिकेने दीड हजार बेड तैनात ठेवले असून घरोघरी तपासणी आणि औषध-गोळ्यांचे वाटपही करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.