डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे आज लोकार्पण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती 

भायखळा येथील राणीचा बागेच्या आवारात असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या नूतनीकरणानंतर वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात येणार आहे.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे आज लोकार्पण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती 
एक्स @Anuraag_Shukla
Published on

मुंबई : भायखळा येथील राणीचा बागेच्या आवारात असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या नूतनीकरणानंतर वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशीष शेलार यांच्यासह  स्‍थानिक खासदार आमदारांची उपस्थिती असणार आहे. 

या  संग्रहालयाच्या वास्तुचे नूतनीकरण मार्च २०२३ मध्ये सुरु करण्यात आले होते. १८ महिन्यांमध्ये सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.  यामध्ये इमारतीच्या छतावर जलावरोध कामे, छताची अंतर्गत दुरुस्ती तसेच त्यावरील नक्षीकाम पूर्ववत करणे, आतील व बाह्य गिलावा (प्लास्टर) दुरुस्ती, खिडक्यांची दुरुस्ती, जोतेक्षेत्राचे संरक्षण , रंगकाम, कठडे, उतरंड (रॅम्प) इत्यादींचा समावेश होता. या सर्व कामांसाठी मिळून सुमारे २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

संग्रहालयाचे वैशिष्ट्ये

संग्रहालयात  विज्ञान, कला व अध्यात्म यांचा संगम आढळून येतो. मातीची लघूशिल्पं, नकाशे, पाषाणावरुन केलेली मुद्रांकनं, छायाचित्रं, दुर्मिळ पुस्तके ही विशेष आकर्षणं आहेत. सहा विविध भागांमध्ये संग्रहालयाची रचना करण्यात आलेली आहे. मुंबईचा इतिहास, औद्योगिक, कला, १९ व्या शतकातील चित्रं, संस्थापकांची दर्शनिका, कमलनयन बजाज मुंबई दर्शनिका आणि कमलनयन विशेष प्रदर्शन दर्शनिका यांचा या रचनेमध्ये समावेश आहे. २००८  मध्ये संग्रहालयाचा जीर्णोद्धार करून  जनतेसाठी पुन्हा खुले करण्यात आले होते. या जीर्णोद्धार प्रकल्पाबद्दल संग्रहालयाला सन २००५ मध्ये 'युनेस्को' चा सांस्कृतिक संवर्धन क्षेत्रातील उत्कृष्टतेचा पुरस्कार देखील प्राप्त झाला.

सांस्कृतिक शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टता साध्य करण्यासाठी  विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून सामाजिक संवाद साधणे, मुलांमध्ये कलेविषयी गोडी निर्माण करणे, मुंबईच्या कलात्मक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहास व विकासाबद्दल जनकुतूहल निर्माण करणे, विविध संस्कृतींमधील परस्पर सामंजस्य आणि सांस्कृतिक जागरूकता वाढवणे हे संग्रहालयाचे मूळ उद्दिष्ट आहे. संग्रहालयाच्या माध्यमातून आंतरवासिता (इंटर्नशिप) कार्यक्रम राबविला जात आहे. संग्रहालयामध्ये येणाऱ्या विविध वयोगटाच्या नागरिकांना मार्गदर्शन करणे, संग्रहालयाच्या उपक्रमांना जनतेपर्यंत पोहोचविणे, कार्यशाळा आयोजन यासाठी पदवी वर्गातील विद्यार्थी, कला शिक्षक यांना या आंतरवासिता कार्यक्रमातून संधी दिली जाते. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांसमवेत मिळून देखील शैक्षणिक साहित्य आदी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी दिली जाते.

logo
marathi.freepressjournal.in