डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सुट्टी ;समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आणि मुंबई उपनगरे या दोन्ही जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात यावी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सुट्टी ;समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश
Published on

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना एक दिवसाची स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी शासकीय परिपत्रक काढून ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सुटी मिळावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले आहे.

समितीची मागणी आणि लोकप्रतिनिधींनी केलेली शिफारस लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाकडून बुधवार, ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगरे जिल्ह्यात एक दिवसाची स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आभार मानल्याचे समन्वयक नागसेन कांबळे यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आणि मुंबई उपनगरे या दोन्ही जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीकडून अनेक वर्षांपासून सुरू होती. यंदा समितीने थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुटी जाहीर करण्याबाबत विषय मांडला. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे आदींकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे समन्वयक नागसेन कांबळे आणि पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. तसेच या मागणीला शिफारस करण्याची विनंती केली.

logo
marathi.freepressjournal.in