चहल जाताच सखोल स्वच्छता अभियान गुंडाळले; दर शनिवारी २५ वॉर्डांत राबवायचे स्वच्छता अभियान

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक परिमंडळांत संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग) राबवण्याचे नियोजन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३ डिसेंबर २०२३ पासून धारावीतून संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला.
चहल जाताच सखोल स्वच्छता अभियान गुंडाळले; दर शनिवारी २५ वॉर्डांत राबवायचे स्वच्छता अभियान

गिरीश चित्रे / मुंबई

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सखोल स्वच्छता अभियानास ३ डिसेंबर २०२३ पासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री ते तत्कालीन आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी स्वत: रस्त्यावर उतरून सखोल स्वच्छता अभियानास चालना दिली. मात्र तत्कालीन आयुक्त चहल यांची बदली झाली आणि सखोल स्वच्छता अभियान २३ मार्चपासून गुंडाळण्यात आल्याची चर्चा पालिकेत रंगू लागली आहे.

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक परिमंडळांत संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग) राबवण्याचे नियोजन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३ डिसेंबर २०२३ पासून धारावीतून संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला. या विशेष मोहिमेंतर्गत रस्ते, पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्याने तसेच क्रीडांगणांची निगा, निर्मळ कर्मचारी वसाहत, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर अशाप्रकारे संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.

सुरुवातीला परिमंडळांत संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात येत होते. त्यानंतर २४ वॉर्डात दर शनिवारी सखोल स्वच्छता अभियान राबवण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी पालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर रोज सकाळी ७ वाजताच्या सुमारास वॉर्डस्तरावर सखोल स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात झाली. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, सफाई कामगार असा लवाजामा घेत सखोल स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात झाली.

लोकांनी सखोल स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन आयुक्त चहल यांनी मुंबईकरांना केले. प्रत्येक वॉर्डात परिमंडळांत लोकांचाही सहभाग वाढत गेला. सलग १५ ते १६ आठवडे स्वच्छता अभियान मोठा गाजावाजा करत राबवण्यात आले. मात्र तत्कालीन आयुक्त चहल यांच्या बदलीचे आदेश आले आणि २० मार्च रोजी चहल यांनी आयुक्तपदाची सुत्रे आताचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे सोपवली. २३ मार्च रोजी शनिवार असल्याने नवनियुक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात येईल, असे बोलले जात होते. मात्र चहल यांची बदली झाली आणि सखोल स्वच्छता अभियानाचा पालिका प्रशासनाला विसर पडला, अशी पालिकेत चर्चा सुरू झाली आहे.

पालिकेला पडला विसर?

सखोल स्वच्छता अभियानात परिमंडळ, त्यानंतर वॉर्ड स्तरावर आणि गल्लीबोळात सखोल स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात झाली. दर शनिवारी रस्त्यांवर पिण्याव्यतिरिक्त पाण्याचा वापर करत रस्ते धुलाई सुरू केली. सखोल स्वच्छता अभियानास वेग आला असताना आणि मुंबईकरांचा सहभाग वाढत असताना आयुक्त चहल यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर चहल यांच्यासह दोन अतिरिक्त आयुक्त यांची बदली करण्यात आली. चहल यांची बदली झाल्यानंतर ही स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी सखोल स्वच्छता अभियान सुरू राहील असे वाटत होते. मात्र चहल यांची बदली होताच स्वच्छता अभियान गुंडाळण्यात आले की पालिकेला त्याचा विसर पडला, अशी चर्चा आता रंगली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in