डॉ.नीलम गोऱ्हेंच्या 'ऐसपैस गप्पा नीलमताईंशी' या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते लवकरच प्रकाशन

नीलमताईंनी या पुस्तकात वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से देखील सांगितले आहे
डॉ.नीलम गोऱ्हेंच्या 'ऐसपैस गप्पा नीलमताईंशी' या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते लवकरच प्रकाशन

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे 'ऐसपैस गप्पा नीलमताईंशी' हे राजहंस प्रकाशनाचे करूणा गोखले यांनी संपादित केलेले पुस्तक प्रकाशित होत आहे. १३ सप्टेंबर रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री चंद्रकांत पाटील,डॉ.सदानंद मोरे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

नीलमताईंच्या बालपणापासून ते आजपर्यंतचा वैयक्तिक,सामाजिक आणि राजकीय प्रवास कसा झाला याचा धांडोळा या पुस्तकाच्या रूपाने घेण्यात आला आहे. वरळीतील आझादनगरातील बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, स्त्रीवादी चळवळ,युक्रांद ते शिवसेना असा राजकीय प्रवास. दरम्यानच्या काळात कधी तरी स्त्रीयांसाठीचा राजकीय पक्ष काढण्याचाही केलेला विचार हे सर्व यात आले आहे. गप्पांच्या स्वरूपात हे पुस्तक असल्याने त्यात जिवंतपणा आला आहे.

एक सामाजिक कार्यकर्ती ते राजकीय नेता या दरम्यानच्या प्रवासात नीलमताईंनी जपलेली वाचन आणि लेखनाची आवड यातून त्यांचा व्यासंग किती जबरदस्त आहे याचीही प्रचिती महाराष्ट्रातील जनतेला होउ शकेल. कदाचित त्यांच्या राजकीय हजरजबाबीपणाचे हा उत्तम व्यासंग देखील एक कारण असू शकेल.

नीलमताई काढणार होत्या महिलांचा राजकीय पक्ष

नीलमताईंनी स्त्रियांचा वेगळा राजकीय पक्षही काढण्याचा विचार केला होता. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी १९९५ साली त्यांनी पुण्यात सहकारी महिलांसमवेत याबाबत बैठकही घेतली होती. वीणा पटवर्धन,पुष्पा भावे आदी या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र निवडणुकीला कोण उभे राहणार या प्रश्नावर आम्ही नाही उभे राहणार,तू पक्ष काढ आम्ही तुला मदत करतो असा सूर इतरांकडून आल्यानंतर ते बारगळले.

गुलाबजामचे शंकरपाळे

नीलमताईंनी या पुस्तकात वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से देखील सांगितले आहेत. मुलींना लहानपणी त्रास देणाऱ्या व्यक्तीला त्या स्वत: लहान असताना कसा चोप देउन ताळयावर आणला होता तो प्रसंग असेल किंवा गीटस गुलाबजाम बनविताना त्याचे झालेले शंकरपाळे असतील. हे प्रसंग आवर्जुन वाचण्यासारखे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in