डाॅ. संग्राम पाटील यांना हायकोर्टाचा दिलासा; इंग्लंडला परतण्याचा मार्ग मोकळा

भाजप नेत्यांविरुद्ध समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर लूकआऊट सर्क्युलर नोटीशीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या यूकेस्थित डॉक्टर आणि यूट्यूबर डाॅ. संग्राम पाटील यांना हायकोर्टाने दिलासा दिला.
डाॅ. संग्राम पाटील
डाॅ. संग्राम पाटील
Published on

मुंबई : भाजप नेत्यांविरुद्ध समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर लूकआऊट सर्क्युलर नोटीशीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या यूकेस्थित डॉक्टर आणि यूट्यूबर डाॅ. संग्राम पाटील यांना हायकोर्टाने दिलासा दिला.

डाॅ. संग्राम पाटील यांनी परदेशातूनही तपास यंत्रणांसमक्ष हजर राहून सहकार्य करण्याचे हमीपत्र सादर केले. याची दखल घेत न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने लूकआऊट सर्क्युलरमध्ये बदल करण्याचे आदेश देत त्यांचा इंग्लंडला परतण्याचा मार्ग मोकळा केला.

भाजप नेत्यांविषययी सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी ब्रिटन येथील डॉक्टर आणि यूट्यूबर संग्राम पाटील यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. याप्रकरणी संग्राम पाटील यांनी हायकोर्टात धाव घेत ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला, ॲॅड. उज्ज्वलकुमार चव्हाण आणि ॲॅड. आदित्य हिरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर सुनावणी झाली.

न्यायमूर्ती भोबे यांच्या एकलपीठाने राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले. एवढा काळ पाटील यांना भारतात अडवून ठेवण्याबाबत आक्षेप घेत पाटील यांना हमीपत्र देण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाटील आणि त्यांच्या आईवडिलांनी इंग्लंडला परतण्याची परवानगी मिळाल्यानंतरही आपण महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करणे सुरूच ठेवू, असे लेखी हमीपत्र न्यायालयात सादर केले.

लूकआऊट परिपत्रकात बदल करण्याचे निर्देश

ॲडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांनी हमीपत्राच्या आधारे पाटील यांच्याविरोधात बजावण्यात आलेल्या लूकआऊट परिपत्रकात (एलओसी) बदल केले जातील आणि त्यानंतर पाटील यांना इग्लंडला प्रवास करता येईल, असे स्पष्ट केले. याची नोंद घेत एकलपीठाने याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

logo
marathi.freepressjournal.in