अखेर डॉ. उल्हास पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते किंवा त्यांची कन्या डॉ. केतकी भाजपच्या तिकिटावर रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
अखेर डॉ. उल्हास पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

जळगाव / मुंबई : काँग्रेसमधून निलंबन केलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी बुधवारी २४ जानेवारी रोजी मुंबईत आपली कन्या डॉ. केतकी पाटील आणि समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी डॉ. केतकी पाटील यांची महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. भाजप प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते किंवा त्यांची कन्या डॉ. केतकी भाजपच्या तिकिटावर रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

बुधवारी दुपारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी डॉ. पाटील यांची कन्या डॉ. केतकी पाटील पत्नी डॉ. वर्षा पाटील, देवेंद्र मराठे यांचेसह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या मनोगतात डॉ. उल्हास पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व व त्यांची कार्यशैली यावर प्रभावित होऊन त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवत या पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले.

विरोधकांच्या आघाडीची शकले होतील : बावनकुळे

दरम्यान, विरोधकांच्या इंडी आघाडीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पवित्र्यामुळे फूट पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात एकीकडे इंडी आघाडीची शकले होताना दिसतील तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा झंझावात दिसून येईल, असा दावा बावनकुळे यांनी यावेळी केला. ज्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्ववादी विचारांना मूठमाती दिली, घराणेशाहीनुसार मुख्यमंत्री असताना स्वत:च्या मुलाला मंत्री केले त्यांना पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांच्या हातातून सत्ता, पक्ष, कार्यकर्ते सगळेच निसटले. उद्धव यांच्या नाकर्तेपणामुळे पक्षाची अशी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अस्वस्थ, विचलित मानसिक अवस्थेत उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये भाजप विरोधात गरळ ओकली, अशी टीकाही त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in