नालेसफाई ९८ टक्के पूर्ण! पालिकेचा दावा; पहिल्याच पावसात पोलखोल होणार असा विरोधकांचा टोला

दरवर्षी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचते आणि मुंबई महापालिकेला टीकेला सामोरे जावे लागते
File Photo
File Photo

मुंबई : ३१ मेपर्यंत नालेसफाईचे १०० टक्के टार्गेट पूर्ण होईल आणि आतापर्यंत ९८ टक्के काम फत्ते झाले असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र पालिकेचा दावा खोडून काढत अनेक ठिकाणी कामच पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात पालिकेचा दावा वाहून जाईल, अशी टीका मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

दरवर्षी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचते आणि मुंबई महापालिकेला टीकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नालेसफाईच्या काम ६ मार्चपासून सुरू करण्यात आले असून ३१ मे पर्यंत नाल्यातील १०० टक्के गाळ उपसा करण्याचे उद्दीष्ट असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत ९८ टक्के गाळ उपसा केला असून उर्वरित २ टक्के गाळ उपसा पुढील तीन ते चार दिवसांत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. ९८ टक्के नालेसफाईचे काम फत्ते असे डॅशबोर्ड जाहीर केले आहे. मात्र पालिकेचा हा पोकळ दावा असून पहिल्या पावसात सगळ समोर येईल, असेही रवी राजा यांनी सांगितले.

दरम्यान, पालिकेने निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ९७९८८२.३९ मेट्रिक टन गाळापैकी ९५६३३७.५८ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. मुंबईत पावसाळ्याआधी ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याच्या दृष्टीने मार्चच्या सुरुवातीला काम सुरू केले जाते. गेल्या वर्षी हे काम रखडल्याने नालेसफाईसाठी पालिकेची चांगलीच धावपळ उडाली होती. त्यामुळे पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी कंत्राटदारांना तीन शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश देत डेडलाइन पाळली होती. सद्यस्थितीत नालेसफाईचे काम समाधानकारकरीत्या सुरू असून पावसाळ्याआधी काम पूर्ण होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीयांकडून करण्यात आलेल्या नालेसफाई पाहणीत पालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पालिकेकडून मात्र ३१ मेपर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा केला आहे. हा दावा खरा नसल्याचे नागरिकांसह काही राजकीय पक्षांनीही म्हटले आहे.

असे झाले काम

मुंबई शहर - ९१.३० टक्के

पूर्व उपनगर - ९९.३० टक्के

पश्चिम उपनगर - ९७.३४ टक्के

मिठी नदी - ८७.२३ टक्के

logo
marathi.freepressjournal.in