
मुंबई: मुंबई ही मायानगरी म्हटली जाते. मुंबईत घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्नं पूर्ण होतच असं नाही. काही जण आपल्या स्वप्नाच्या दिशेने, आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असतात, त्यात त्यांना यशही लाभतं. मात्र काहींच्या पदरी निराशा येते. त्यामुळेच मायानगरीत मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत कायम चढउतार पाहायला मिळतात. अशाच एका आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत तब्बल ६.३९ टक्क्क्यांची कपात झाली आहे.
२०२२मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे तब्बल ६६ हजार ७६० मालमत्तांच्या विक्रीची नोंद झाली होती. गृहखरेदीदारांनी कोरोनाचा विळखा सैल झाल्यानंतर मुंबईत मालमत्ता विकत घेण्यास पसंती दर्शवली होती. मात्र आता कोरोनाचा विळखा पूर्णपणे नाहीसा झाला असला तरी वाढलेल्या व्याजदरामुळे मुंबईकरांनी यंदा गृहखरेदीकडे जोर दिला नसल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. जानेवारी ते जून २०२३ या कालावधीत ३० जूनपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत ६२ हजार ४९२ मालमत्तांची विक्री झाली आहे, याचा अर्थ मुंबईतील मालमत्ता खरेदी-विक्री पहिल्या सहामाहीत तब्बल ६ टक्क्यांनी घटली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत मुंबईत मालमत्तांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२३मध्ये मुंबईत तब्बल १० हजार ३१९ मालमत्तांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये हीच संख्या ९ हजार ९१९ इतकी होती.
मालमत्तांच्या नोंदणीत घट नोंदवली गेली असली तरी, रिअल इस्टेट सल्लागार आणि ब्रोकरेज संस्थांच्या मते, मालमत्ता खरेदी-विक्रीचा हा ट्रेंड कमी-खाली होत असला तरी लवकरच त्यात तेजी येईल, असे बोलले जाते. मालमत्ता खरेदी-विक्री जोमात असल्याचे सल्लागार आणि ब्रोकरकडून सांगण्यात येत असले तरी आकडेवारीवरून मात्र विरोधाभास दिसून येत आहे.
“मालमत्तांची विक्री आणि विपणन करणाऱ्या संस्था नेहमीच रिअल इस्टेट क्षेत्राचे आभासी चित्र निर्माण करतात. कारण त्याच्यामागे त्यांचा साधा आणि सोपा अजेंडा असतो. मालमत्ता विक्रीतून आपल्या कंपनीच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी, हाच त्यांचा उद्देश असतो,” असे रिअल इस्टेट क्षेत्रातील एका मोठ्या गुंतवणूकदाराने सांगितले.
“मालमत्ता खरेदी करण्यासाठी बाजारात खूप उत्साह आहे आणि रिअल इस्टेट सल्लागार कंपन्यांच्या मते, मालमत्तांना खूप मागणी आहे, असे चित्र दाखवले जात असले तरी इतक्या वर्षांपासून मालमत्तांच्या किंमतीमध्ये स्थिरता का आहे? उत्पादन किंवा सेवेची किंमत ही मागणी आणि पुरवठा यांच्यातील परस्पर संवादावर थेट अवलंबून असते. मालमत्तांना खूप मागणी आहे, असे चित्र असतानाही दर महिन्याला त्याच्या किंमतींमध्ये वाढ होत असती, मात्र महागाईचा दबाव असल्याचे खुद्द रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर स्पष्ट करतात,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
यामुळे मागणी घटली
अलीकडच्या काळात अनेक वादळे आली, त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यात सर्वाधिक मोठे वादळ हे कोरोनाचे होते. कोरोनामुळे मुंबईतील गृहखरेदीला खिळ बसली होती. त्याचबरोबर वाढलेली महागाईल, गृहकर्जाच्या व्याजदरात झालेली वाढ, उच्च मुद्रांक शुल्क या सर्व गोष्टींचा फटका गृहखरेदीला बसला होता.
व्याजदरवाढीचा फटका
रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो रेट किंवा व्याजदरात वाढीची घोषणा केल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रातील बड्या गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त केली असली तरी त्याचा परिणाम थेट मालमत्ता विक्रीवर झाला आहे. मात्र काही दिवसानंतर त्यांच्याकडून विरोधाभासी वक्तव्ये सादर होऊ लागली आहेत. त्यांच्या मते, मालमत्ता खरेदी-विक्रीचा ट्रेंड सध्या जोरात सुरू असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
मालमत्ता खरेदी विक्री
महिना/वर्ष २०२२ २०२३
जानेवारी ८,१५५ ९,००१
फेब्रुवारी १०,३७९ ९,६८४
मार्च १६,७२६ १३,१५१
एप्रिल ११,७४३ १०,५१४
मे ९,८३८ ९,८२३
जून ९,९१९ १०,३१९
एकूण ६६,७६० ६२,४९