बॉलिवूड अभिनेत्री होण्याचे स्वप्न भंगले; वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी बड्या उद्योगपतीसह तिघांवर गुन्हा दाखल

न्यायालयाने ठाणे पोलिसांना आदेश दिल्यानंतर कापुरबावडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री होण्याचे स्वप्न भंगले; वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी बड्या उद्योगपतीसह तिघांवर गुन्हा दाखल
Published on

प्रणाली लोटलीकर / मुंबई

अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाण्यातील एका महिलेने उद्योगपती श्यामसुंदर भारतीया व अन्य तिघांविरोधात अनेकवेळा बलात्कार, धमकी आणि ॲट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याची प्रत ‘फ्री प्रेस जर्नल’कडे आहे. हा गुन्हा २२ फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आला होता. या तक्रारीत श्यामसुंदर भारतीया, पूजा कवलजीत सिंग, तिचे पती कवलजीत सिंग आणि त्यांची मुलगी मल्लिका कवलजीत सिंग यांचा समावेश आहे. तसेच या आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अंतर्गत जातिवाचक अत्याचार केल्याचा आरोप ठेवला आहे. तक्रारदार ही अनुसूचित जातीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ही तक्रारदार महिला काही काळापासून चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. २०२२ मध्ये तिची ओळख निर्माता हाशिम खान यांच्याशी झाली. त्यांनी तिची पूजा कवलजीत सिंग यांच्याशी ओळख करून दिली. जिचे बॉलीवूडमध्ये चांगले संबंध असल्याचा दावा करत होती. २०२३ मध्ये हाशिम खान यांचे निधन झाल्यानंतर, तक्रारदार महिलेने पूजा कवलजीत सिंग हिच्याशी संपर्क साधला. पूजाने तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यानंतर, २ मे २०२३ रोजी पूजाने तक्रारदार महिलेची श्यामसुंदर भारतीया यांच्याशी ओळख करून दिली. त्यांची पहिली भेट सांताक्रूझ विमानतळाजवळील ताज हॉटेलमध्ये झाली. श्यामसुंदर भारतीयांनी तिला स्टार बनवण्याचे आश्वासन दिले. तिला व पूजाला सिंगापूरमधील आपल्या बंगल्यावर आमंत्रित केले.

९ मे २०२३ रोजी श्यामसुंदर भारतीयांनी व्हॉट्सॲपवरून आपली खासगी क्रेडिट कार्डची माहिती पाठवली आणि १८ ते २४ मे दरम्यानच्या विमानाच्या तिकिटांचे बुकिंग करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार आणि पूजा १९ मे रोजी सिंगापूरला रवाना झाल्या.

श्याम सुंदर भारतीया विमानतळावर तक्रारदार व पूजाला नेण्यासाठी आले. ते त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले. दिवसभर अनौपचारिक संवादानंतर, संध्याकाळी ७ वाजता पूजाने व श्याम सुंदर भारतीयांनी मद्यपान सुरू केले. तक्रारदार महिलेने दारू पिण्यास नकार दिला. तेव्हा पूजाने जबरदस्ती केली आणि भारतीया रागावतील, असे सांगून दडपण आणले.

दारू प्यायल्यावर तक्रारदार महिलेची तब्येत बिघडली. एफआयआरनुसार, भारतीयाने तिच्यावर निर्दयीपणे बलात्कार केला. हा प्रकार पूजाने चित्रीत केला. या सर्व प्रकरणावर चूपचाप बसण्याचे बजावून तक्रारदार महिलेला ब्लॅकमेल केले. २४ मे रोजी तक्रारदार महिला मुंबईत परतली.

पूजाने तक्रारदार महिलेवर दबाव टाकला आणि सांगितले की, चित्रपट उद्योगात अशा गोष्टी सामान्य आहेत. २६ जून २०२३ रोजी तिला आयटीसी मराठा हॉटेल, सहार आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बोलावण्यात आले. तेथे तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी तिला बद्रीनाथ टॉवर्स, वर्सोवा येथे पूजाच्या घरी बोलावण्यात आले. इथेही श्यामसुंदर भारतीयाने तिच्यावर बलात्कार केला. त्याच दिवशी, ताज लँड्स एंड हॉटेल, वांद्रे येथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले.

११ जानेवारी २०२५ रोजी, तक्रारदार महिला आपल्या ठाणे येथील घरी असताना पूजाने तिला अनेक वेळा कॉल करून शिवीगाळ केली. पूजाचा पती कवलजीत सिंग व त्यांची मुलगी मल्लिका सिंग यांनीही तिला धमकावून जातिवाचक अपशब्द वापरले. आमच्याविरोधात कोणतेही पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करणार नाही.

एफआयआरसाठी न्यायालयीन लढा

तक्रारदार महिलेने एफआयआर नोंदवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी, मोहम्मद अहमद शेख आणि सोफिया शेख या तिच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली. त्यात ठाणे पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावर, न्यायालयाने ठाणे पोलिसांना आदेश दिल्यानंतर कापुरबावडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in