

सोमेंद्र शर्मा/मुंबई
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चालणाऱ्या परदेशी सोन्याच्या तस्करीच्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका कंत्राटी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी मुंबईमार्गे दुबई, बँकॉक आणि माले दरम्यान प्रवास करणाऱ्या ट्रान्झिट प्रवाशांचा वापर करून तस्करी करत असल्याचे समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये टिटवाळा येथील रहिवासी मुनाफ जमादार (२३) आणि बांगलादेशी नागरिक मोहम्मद मोहिउद्दीन (३६), मोहम्मद होसेन (३७), मोहम्मद आलम (३८), मोहम्मद नासर (३८) व मोहम्मद नाजिमुद्दीन (३०) यांचा समावेश आहे. विमान कंपनीत ग्राऊंड स्टाफ म्हणून काम करणारा मुनाफ जमादार हा विमानतळावरून सोन्याच्या तस्करीत सहभागी असल्याची विशिष्ट बातमी मिळाली होती. हा कर्मचारी तस्कर केलेले सोने विमानतळाबाहेर एका व्यक्तीकडे सोपवणार असल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाने दिली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून जमादार याला ताब्यात घेतले. त्याच्या पॅन्टच्या मागच्या खिशांची झडती घेतली असता, मेणाच्या स्वरूपात सोन्याची पावडर असलेल्या अंड्याच्या आकाराच्या सात कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे या टोळीतील इतर पाच सदस्यांना (सर्व बांगलादेशी ट्रान्झिट प्रवासी) ताब्यात घेण्यात आले.
कोर्टात मोहम्मद मोहिउद्दीन, मोहम्मद आलम आणि मोहम्मद नाजिमुद्दीन यांच्यावतीने ॲडव्होकेट आशीष सिंह आणि बीरेंद्र यादव यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत (ज्युडिशियल कस्टडी) रवानगी केली.
आणखी पुरावे गोळा करत आहोत
कारवाईत डीआरआयने टोळीतील सदस्यांकडून एकूण ६,६५० ग्रॅम (६.६५ किलो) सोने जप्त केले असून त्याची बाजारपेठेतील किंमत १०.७५ कोटी रुपये आहे. या तस्करीत ३.७६ कोटी रुपयांची कस्टम ड्युटी (सीमा शुल्क) बुडवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'चालू तपासात आणखी पुरावे गोळा केले जात असून त्याची तपासणी सुरू आहे. टोळीतील इतर मुख्य साथीदारांना पकडणे अद्याप बाकी असून प्राथमिक टप्प्यावर सर्व शक्य प्रयत्न केले जात आहेत,' असे वरिष्ठ डीआरआय अधिकाऱ्याने सांगितले.