मध्य रेल्वेवर डिसेंबर अखेरीस "मेघदूत''द्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार

नव्या कंत्राटदाराची नेमणूक; सीएसएमटी, कुर्ला, दादर, विक्रोळी, ठाणे स्थानकात मशिन्स उभारण्याचे काम सुरु
मध्य रेल्वेवर डिसेंबर अखेरीस "मेघदूत''द्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार

मागील काही महिन्यांपासून उपनगरीय रेल्वे मार्गावर वॉटर वेंडिंग मशिन्स बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीही अवलंबल्या जात आहेत. स्थानकांवरील पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी पाहता सीएसएमटी, दादर कुर्ला, विक्रोळी, ठाणे या गर्दीच्या स्थानकांवर वॉटर वेडिंग मशिन्स उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विभागाने यासाठी नव्याने कंत्राटदार नेमले असून येत्या २० डिसेंबरपर्यंत या स्थानकात प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

अवघ्या एक ते दोन रुपयांमध्ये 'आरओ'चे शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर आयआरसीटीसीने काही वर्षांपूर्वी वॉटर वेंडिंग मशीन बसविल्या आहेत. मध्य रेल्वेवर जवळपास ८० तर पश्चिम आणि हार्बर मार्गावर जवळपास ६० वॉटर वेंडिंग मशिन्स बसवण्यात आल्या. परंतु या मशीन कोरोनाकाळापासून बंद पडल्या आहेत. यामुळे प्रवाशांना पाणी पिण्यासाठी पाण्याचा बॉटल विकत घ्याव्या लागत आहेत. तर काही प्रवाशांना नळाचे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. कामगारांना पगार देता येण्याएवढा फायदा कंत्राटदारांना मिळत नसल्याने या मशीन पूर्णतः बंद पडल्याचे मधल्या काळात बोलले जात होते. तर काही कंत्राट संपल्याने नव्याने नेमणूक सुरु असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. परंतु मागील ३ वर्षांपासून या मशिन्स बंद असून प्रवाशांना पाण्यासाठी खिशाला भुर्दंड पाडावा लागत आहे. याबाबत प्रवाशांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वॉटर वेडिंग मशिन्स सेवा सुरु करण्यासाठी नव्याने कंत्राटदार नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया मध्य रेल्वेकडून पूर्ण करण्यात आली. यानुसार मेघदूत कंपनीला नव्याने कंत्राट देत सीएसएमटी, कुर्ला, दादर, ठाणे, विक्रोळी या स्थानकांवर या मशिन्स उभारण्याचे कामकाज सुरु आहे. येत्या २० डिसेंबरपासून ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in