शिपाई महिलेच्या विनयभंगप्रकरणी चालकाला अटक

सरकारी कामात अडथळा आणून एका पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका २८ वर्षांच्या चालक आरोपीला आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे.
शिपाई महिलेच्या विनयभंगप्रकरणी चालकाला अटक

मुंबई : सरकारी कामात अडथळा आणून एका पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका २८ वर्षांच्या चालक आरोपीला आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. संदीप त्रिभुवनदास कनोजिया असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजता चेंबूर येथील पांचरापोळ जंक्शन, वाहतूक शाखेजवळ घडली.

२९ वर्षांची तक्रारदार महिला नवी मुंबईतील उलवे परिसरात राहत असून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. शनिवारी सकाळी ती तिच्या सहकाऱ्यासोबत वाहतूकीचे नियमन करत होती. सकाळी सव्वाअकरा वाजता पोलिसांनी एका कारला थांबविले होते. ही टूरिस्ट कार असल्याने चालकाला पोलिसांनी त्याच्या ड्रेसबाबत विचारणा केली होती. त्याला दंड भरण्यास सांगण्यात आले होते. त्याचा राग आल्याने त्याने तिच्यासह तिच्या दोन सहकाऱ्यांना अश्‍लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने तिची कॉलर पकडून तिच्या छातीला अश्‍लील स्पर्श करून जोरात धक्का दिला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला बळाचा वापर करून चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याने मोठमोठ्याने आरडाओरड करून तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पोलिसांच्या हातातील ई-चलन तोडण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संदीप कनोजिया याच्याविरुद्ध विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

logo
marathi.freepressjournal.in