नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दणका; ६५ लाख वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, १५७ कोटींचा दंड वसूल

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ लाख १२ हजार ८४६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दणका; ६५ लाख वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, १५७ कोटींचा दंड वसूल
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ लाख १२ हजार ८४६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५२६ कोटींचा दंड ठोठावण्यात आला असला तरी प्रत्यक्षात १५७ कोटी रुपयांचा दंड वाहनचालकांनी भरला, तर ३६९ कोटी रुपये थकबाकी राहिल्याची माहिती अधिकारात वाहतूक पोलिसांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात वाहतूक पोलिसांकडून माहिती मागितली होती. वाहतूक पोलिसांनी माहिती अधिकारात माहिती उपलब्ध केली असून १ जानेवारी २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५,१३,८४६ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ प्रकारच्या वाहतूक नियमभंग प्रकरणांमध्ये ४१ वाहतूक आणि १ मल्टिमीडिया विभागाद्वारे कारवाई करण्यात आली.

अंबर दिव्यांवर कारवाई

वाहतूक नियमांचे उल्लंघन करत अंबर दिवे वापरणाऱ्या ४७ वाहनचालकांविरोधात कारवाई करत २३,५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. मात्र, यातील केवळ ७ वाहनचालकांनी ३,५०० रुपये दंड अदा केला. सर्वाधिक कारवाई मरीन ड्राईव्ह परिसरात झाली असून ३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

डिजिटल नोटीस पाठवा

वाहतूक पोलिसांनी समाधानकारक कारवाई केली असली तरीही अधिकाऱ्यांची व कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणावर दंड वसुली होत नाही. दंड न भरलेल्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष वसुली मोहीम राबविण्याची गरज आहे. दंड वसुलीसाठी वाहनचालकांना डिजिटल नोटिसा पाठवाव्यात. मोठ्या थकबाकीदार वाहनधारकांची वाहने जप्त करण्याची प्रक्रिया राबवावी, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in