
मुंबई : वातावरणात झालेल्या बदलामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक बुधवारी दिवसभर विस्कळीत झाले होते. टिटवाळा ते वाशिंद व कर्जत ते बदलापूर दरम्यान दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावत होती, तर दुपारी चार ठिकाणी मध्य रेल्वेने २० मिनिटांचे ब्लॉक घेतल्याने बुधवारी दुपारी मेनलाईन व हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अचानक घेतलेला मेगाब्लॉक व धुक्याचा परिणाम, यामुळे लोकल सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली.
बुधवारी सकाळी मध्य रेल्वेवर वाशिंद ते टिटवाळादरम्यान दाट धुके पडल्याने सकाळी ६.३० ते ९ वाजताच्या दरम्यान रेल्वे गाड्या धीम्या गतीने धावत होत्या. तर कर्जत ते बदलापूरदरम्यान सकाळी ५.३० ते ९ या वेळेत दाट धुके पडल्याने गाड्या धीम्या गतीने धावत होता. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. तसेच वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे व त्याचा परिणाम रेल्वे रूळांवर होत असल्याने मध्य रेल्वेने दुपारी १२ वाजताच्या सुमारास सायन, वाशी, आसनगाव व बदलापूर या ठिकाणी प्रत्येकी २० मिनिटांचे ब्लॉक घेतले. त्यामुळे लोकल खोळंबल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांवर त्याचा परिणाम झाला.