यंदा ऑगस्ट महिन्यात विविध सणांमुळे लागोपाठ सुट्ट्या आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी बाहेर पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन केले आहे. अशातच येत्या शनिवारपासून सलग चार दिवस सुट्ट्या असल्याचा गैरफायदा घेत खासगी प्रवासी बसधारकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंत मुंबईतून राज्यातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे कोकण, गोवा, महाबळेश्वरसह अन्य भागात पर्यटनासाठी, सुट्टीसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
पावसाळा म्हटला की विविध ठिकाणी पावसाचा, धबधब्यांचा तसेच पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी बहुतांश नागरिक नियोजन करता. अशातच यंदा ऑगस्ट महिन्यात येत्या शनिवारपासून लागोपाठ ४ दिवसांच्या सुट्ट्या आल्याने मुंबईतून विविध ठिकाणी पर्यटनस्थळी जाणाऱ्या नागरिकांची मोठी झुंबड दिसणार आहे. याचाच फायदा घेत खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी भाडेदरात वाढ केली असल्याचे सांगण्यात येत आहे. १२ ऑगस्टपासून ही भाडेवाढ करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.