मुसळधार पावसामुळे मुंबईतील जलसाठ्यात वाढ,पाणी तुटवड्याची चिंता मिटली

जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे जलसाठा नऊ टक्क्यापर्यंत खालावला होता
 मुसळधार पावसामुळे मुंबईतील जलसाठ्यात वाढ,पाणी तुटवड्याची चिंता मिटली

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील जलसाठा ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजघडीला तलावांमध्ये एकूण ११ लाख ३८ हजार ९७ दशलक्ष लिटरवर वापरायुक्त पाणी उपलब्ध झाले असून, पाणी तुटवड्याची चिंता मिटली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा साठा सर्वात जास्त म्हणजेच तिप्पट आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणामध्ये सध्या ७८.६३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे जलसाठा नऊ टक्क्यापर्यंत खालावला होता; मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत खालावलेल्या जलसाठ्यात आठवडाभरात चांगलीच वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये तिप्पट जलसाठा उपलब्ध झाला आहे.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये तलावांतील जलसाठ्याचा आढावा घेण्यात येतो.

त्यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्यास पाणीकपातीची आवश्यकता भासत नाही. सध्या सातही धरणांत ११ लाख ३८ हजार ९७ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. पावसाळ्याचे अडीच महिने शिल्लक असून तोपर्यंत तलाव काठोकाठ भरतील अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in