बेस्टला बंद पुलांचा फटका! पूल बंदमुळे मुंबईतील वाहतूककोंडी समस्या

अंधेरी येथील गोखले उड्डाणपूल गेली दोन ते तीन वर्ष बंद आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व ते पश्चिम थेट संपर्क तुटला आहे. त्यामुळे बेस्टला आपले बऱ्याच बसमार्गांचा मार्ग बदल करावा लागला आहे. तर काही बसमार्ग खंडित करावे लागले आहेत, तर काही बसमार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
बेस्टला बंद पुलांचा फटका! पूल बंदमुळे मुंबईतील वाहतूककोंडी समस्या

मुंबई : अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग यामुळे आधीच वाहतुकीतून मार्ग शोधत वाहनधारकांना इच्छित स्थळी पोहोचावे लागते. त्यात सायन स्थानकातील रोडओव्हर पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर मुंबईत दीड ते दोन वर्षे वाहतुकीचा खेळखंडोबा होणार आहे. अंधेरी येथील गोखले पूल, रे रोड पूल, कर्नाक पूल व घाटकोपर येथील लक्ष्मीनाला पूल हे पूल गेल्या चार ते पाच वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांसह बेस्ट उपक्रमाला फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, तीन पूल बंद त्यात सायन पूल बंद केल्याने मुंबईत प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. सायन पुलाचे पाडकाम हाती घेतल्यानंतर या रोडओव्हर पुलावरून जाणाऱ्या बेस्टच्या २० ते २२ बसेसना फटका सहन करावा लागणार आहे. सायन पुलाच्या कामासाठी वाहतूक बंद केल्यानंतर जवळपास २० ते २२ बसमार्ग वळवण्यात येतील, तर काही बंद करण्यात येणार असल्याने बेस्ट उपक्रमाला प्रवाशांसह आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

अंधेरी येथील गोखले उड्डाणपूल गेली दोन ते तीन वर्ष बंद आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व ते पश्चिम थेट संपर्क तुटला आहे. त्यामुळे बेस्टला आपले बऱ्याच बसमार्गांचा मार्ग बदल करावा लागला आहे. तर काही बसमार्ग खंडित करावे लागले आहेत, तर काही बसमार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. बस क्रमांक ए-१८०, २९० मर्यादित, ए-३५९, २५५, हे बसमार्ग जोगेश्वरी उड्डाणपुलावरून प्रवर्तित केले असून बस क्रमांक ५३३ मर्यादित हा अंधेरी पश्चिमेऐवजी पूर्वेकडे खंडित करावा लागला आहे. बस क्रमांक ४२२ हा मिलन सबवे उड्डाणपुलावरून पश्चिमेकडे नेणे भाग पडले आहे. बस क्रमांक ३२८, ३३६ व १८२ हे बसमार्ग पूर्णपणे बंद करावे लागले आहेत. त्यामुळे या मार्गावरील जाणाऱ्या बस प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तर दुसरीकडे कर्नाक बंदर पूल बंद असल्यामुळे बस क्रमांक ४१ बंद करावा लागला असून ए-२६ बस जीपीओमार्गे वळवावी लागली आहे. तर रे रोड उड्डाणपूल पूर्णपणे तोडून नव्याने बांधकाम येत असल्यामुळे या पुलावरून जाणारे बस क्रमांक १६८ व ६० या दोन बसगाड्यांना कॉटन ग्रीनला मोठा वळसा घालून जावे लागत आहे. तर अनेक वर्षांपासून घाटकोपर पूर्व-पश्चिम जोडणारा लक्ष्मीनाला पूल बंद असल्यामुळे बेस्टचे असंख्य बसमार्ग लक्ष्मीनाला येथे खंडित करावे लागले आहेत. याचा फटका प्रवाशांना नव्हे तर बेस्ट कर्मचाऱ्यांना बसला असून रोज त्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे.

लक्ष्मी नाल्यावरील पुलावरून बस न्यायची असल्यास ती बस लक्ष्मीनाला येथे संपूर्ण रिकामी करावी लागते व मगच तात्पुरत्या पुलावरून बस घाटकोपर आगारमध्ये पाठवावी लागते. तर इतर लक्ष्मीनगरहून पूर्व द्रूतगती मार्गाकडे एक किलोमीटर अंतर पार करण्याकरिता पाच किमीचा लांबचा वळसा घालावा लागत आहे. तेथून जाणारे बस क्रमांक २७-ए, ४८८, ४८९ मर्यादित, ए-४९३ या बसगाड्यांना पंतनगर व रेल्वे पोलीस वसाहतमार्गे पुन्हा पाठवून पूर्व द्रूतगती महामार्गाकडे फिरून जावे लागत आहे. तर पूर्व द्रूतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपूल नव्याने बांधण्यात घेण्यात आल्याने घाटकोपर गारुडिया नगरहून शिवाजीनगरकडे जाणारी ए-४०४ या बसगाडीला थेट घाटकोपर आगार येथील उड्डाणपुलापर्यंत वळसा घालावा लागत आहे. तर तिथे स्वामी विवेकानंद मार्गावरील ओशिवरा नाल्यावरील पूल कमकुवत झाल्यामुळे गेली अनेक वर्षांपासून बंद आहे त्यामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील बसगाड्या ४ मर्यादित, ८४ मर्यादित, ए-२०२, २०३, ए-३५९, २९० मर्यादित आणि ए-२५६ या बसगाड्यांना रिलीफ मार्गाने ओशिवरा आगार बेस्ट नगरमार्गे पुन्हा स्वामी विवेकानंद मार्गाकडे मोठा वळसा घालावा लागत आहे. यात फक्त अर्धा किंवा एका किमीसाठी मोठे वळसे घालावे लागत असल्याने बेस्टचे इंधन तर वाया जातेच. परंतु प्रवाशांनाही आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in