वाढत्या लोकसंख्येमुळे मालाड येथे पी उत्तर हा नवीन विभाग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने

वाढत्या लोकसंख्येमुळे मालाड येथे पी उत्तर हा  नवीन विभाग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने

वाढत्या लोकसंख्येमुळे मालाड येथे पी उत्तर हा आणखी एक नवीन विभाग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र नवीन विभागासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पी उत्तर विभागाचे विभाजन रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नवीन जागेचा शोध मुंबई महापालिका प्रशासनाने सुरु केला आहे.

कुर्ला एल विभाग आणि अंधेरी के-पूर्व विभागानंतर पालिकेने मालाड पी-उत्तर विभागाचेही विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पी-उत्तर विभागाची लोकसंख्या नऊ लाख ५९ हजार ५९५ इतकी असून पालिकेच्या २३ विभागातील लोकसंख्येच्या तुलनेत ती जास्त आहे. त्यामुळे विभागात सेवा सुविधा पुरवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रत्येक ठिकाणी वेळेत सेवा सुविधा पुरवणे शक्य होत नसल्यामुळे प्रशासनाला तसेच नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. यासाठी प्रशासनाने या विभागाची विभागणी करण्याचा निर्णय घेतला.

पी-उत्तर विभागात सध्या पालिकेचे १८ प्रभाग असून यात मालाड पश्चिमसह मालाड पूर्व विभागाचाही समावेश आहे. विभाजनात पी-पूर्व विभागात दहा व पी-पश्चिम विभागात आठ प्रभागांचा समावेश करण्यात येणार आहे. पी-उत्तर विभागाची सध्याची प्रशासकीय कार्यालयाची इमारत मोडकळीस आल्यामुळे ती नव्याने बांधण्यात येत आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे मालाड पी-पश्चिम विभागाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तर पूर्व विभाग कार्यालय मालाड पूर्वेला उभारण्यात येणार आहे.

११ हजार चौरस फूट जागेची गरज

प्रशासकीय विभाग कार्यालय चालवण्यासाठी सुमारे ११ हजार चौरस फूट जागेची गरज आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी विकास आराखडा विभागाला जागेचा शोध घेण्यास सांगितले आहे. एक प्रसूतीगृह व एका पालिका शाळेची जागा सूचवण्यात आली होती. या जागेची पाहणी केली असता त्यांनाच ती पुरत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर न्यू इंडिया कम्पाऊण्ड येथे एक ८८१ चौरस फूट जागा पाहण्यात आली. मात्र ती एसआरएसाठी एका बिल्डरला विकासासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे तो पर्याय ही अयशस्वी झाला. त्यामुळे नवीन जागेचा शोध सुरु असल्याचे पी उत्तर विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in