मुंबई, ठाणे, रायगड आज होरपळणार

मुंबईत आधीच प्रदूषण वाढत असल्याने हवेचा दर्जा खालावत असताना उकाड्याने या टेन्शनमध्ये आणखी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पालिका आणि 'निरी'च्या माध्यमातून मुंबईतील उष्ण भाग शोधून कार्यवाही केली जाणार आहे.
मुंबई, ठाणे, रायगड आज होरपळणार
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तापमानाचा पारा चढा असून सोमवारी मुंबई परिसरात सूर्य आग ओकत असल्याचे जाणवत होते. मंगळवारी त्यात आणखी भर पडणार असून मुंबई, ठाण्यासह रायगडमध्ये पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअस पार जाण्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

तापमानात होणाऱ्या वाढीमुळे मुंबई, ठाण्यासह रायगडमधील लोकांनी विशेषतः दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे. १ मार्च ते १२ एप्रिल २०२४ पर्यंत राज्यात उन्हाच्या तडाख्यामुळे ७७ जणांना त्रास झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ‘निरी’ संस्थेच्या मदतीने मुंबईतील ‘हॉट’ स्पॉटचा शोध घेण्यात येत असून अशा ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. होळीनंतर मुंबईतील तापमानात वाढ होत असून सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून मायानगरी मुंबई, ठाण्यासह रायगडमध्ये पुढील काही दिवस उकाड्यात मोठी वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

मुंबईत आधीच प्रदूषण वाढत असल्याने हवेचा दर्जा खालावत असताना उकाड्याने या टेन्शनमध्ये आणखी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पालिका आणि 'निरी'च्या माध्यमातून मुंबईतील उष्ण भाग शोधून कार्यवाही केली जाणार आहे.

मुंबईत ३८, तर ठाण्यात उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

सोमवारी प्रचंड उकाड्यामुळे मुंबईकरांसह ठाणेकरांचा घामटा निघाला. सोमवारी दुपारनंतर मुंबईचा पारा ३८ अंश सेल्सिअस, तर ठाण्यात तब्बल ४२ अंश सेल्सिअसवर पोहचला होता. ठाणे जिल्ह्याला उष्ण लहरींचा तडाखा बसत असून शहरातील तापमानाने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास उच्चांक गाठल्याची नोंद महापालिकेच्या आपत्ती विभागात नोंदविण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या अंगांची लाही लाही झाली. वाढत्या तापमानामुळे लोकांनी शीतपेये, कलिंगड, काकडी, आइस्क्रीमवर ताव मारला.

हे भाग असतील संभाव्य ‘हॉट’ स्पॉट

मुंबईत विशेषतः उद्योग, बांधकामे सुरू असलेल्या भागात उष्णता सर्वाधिक असल्याचा अंदाज आहे. शिवाय बेकरी व्यवसाय असणारे भाग, लोखंडी कामे होणारे भाग, स्टील व्यवसाय आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी 'हॉट' स्पॉट (उष्ण भाग) शोधले जातील.

उष्णता कमी करण्यासाठी उपाययोजना

'हॉट' स्पॉट असलेल्या भागात उष्णता कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल. उद्योग-व्यवसायातील कामातून कमीत कमी उष्णता निर्माण होईल यासाठी उपाययोजना सुचवण्यात येतील. मोठ्या प्रमाणात वाहने असणाऱ्या ठिकाणी, सर्वाधिक प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी स्प्रिंकलर, प्रदूषण दूर करणारी यंत्रणा बसवण्यात येईल.

उष्माघात कसा ओळखाल

उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरनहाईटपर्यंत (४० डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात. लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसतात.

असा करा उकाड्यापासून बचाव

  • उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी,

  • दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात थांबा

  • पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, थेट येणारा सूर्यप्रकाश, ऊन टाळा.

  • पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.

  • उन्हात चप्पल न घालता अनवाणी चालू नये. चहा, कॉफी इत्यादी गरम पेये टाळावीत.

उष्माघाताचा तडाखा बसलेले रुग्ण

बुलढाणा - १२, सिंधुदुर्ग - ९, वर्धा - ८, नाशिक - ६, कोल्हापूर - ५, पुणे - ५, सोलापूर - ३, ठाणे - ३, धुळे - ३, अमरावती - ३, अहमदनगर - २, बीड - २, जळगाव - २, रायगड - २, परभणी - २, चंद्रपूर - २, नांदेड - १, नागपूर- १, सातारा - १, रत्नागिरी - १, गोंदिया - १, अकोला - १, उस्मानाबाद - १, भंडारा - १.

logo
marathi.freepressjournal.in