मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे दोन लोकलची टक्कर टळली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील घटना
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे दोन लोकलची टक्कर टळली
Published on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मुंबईच्या मुख्य रेल्वे स्थानकात गुरुवारी दोन लोकल ट्रेनची टक्कर मोटरमनच्या तत्काळ निर्णय घेऊन केलेल्या कृतीमुळे टळली. यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

ही घटना गुरुवारी दुपारी ३.२० च्या सुमारास घडली. सीएसएमटच्या फलाट क्रमांक ४ वरून ठाण्याकडे जाणारी लोकल सुटली. याचवेळी कल्याणकडून सीएसएमटीच्या दिशेने लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या दिशेने येत होती. ही धोकादायक स्थिती ठाणे लोकलच्या मोटरमनच्या लक्षात आली. कल्याण-सीएसएमटी लोकल जवळ आल्यावर त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखले.

कल्याण-सीएसएमटी मोटरमनने लाल सिग्नल (सिग्नल क्र. २६) ओलांडला होता. अनावधानाने प्लॅटफॉर्म क्रमांक ४ साठी असलेल्या ट्रॅकवर ती लोकल गेली. कल्याण-सीएसएमटी लोकलच्या मोटरमनला कठीण परिस्थितीची जाणीव झाली. त्याने तत्काळ ट्रेन थांबवली. दोन्ही मोटरमननी आपत्कालीन ब्रेकिंग यंत्रणा वापरली, असे सूत्रांनी सांगितले.

"या घटनेनंतर, कल्याण-सीएसएमटी ट्रेनला ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलचा मार्ग मोकळा करण्यासाठी थोडे पाठीमागे नेले. त्यानंतर कल्याण-सीएसएमटी लोकलला फलाटावर नेले. पुढील तपासणीसाठी ती कारशेडमध्ये पाठवली," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेकडून चौकशी सुरू

रेल्वेने तत्काळ या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सिग्नल बंद पडल्याने ही घटना घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु एका कामगार संघटनेच्या नेत्याने सीएसएमटी यार्डच्या २६ क्रमांकाच्या सिग्नलच्या चुकीच्या स्थितीला जबाबदार धरले आहे.

logo
marathi.freepressjournal.in