अग्निशमन दलाची दमछाक! हायराईज व्हेईकलअभावी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी

मुंबईत आगीच्या घटना लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच आता उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्याने हे प्रमाण अधिकच वाढणार आहे. परिणामी या सर्वांवर मात करण्यासाठी मुंबई अग्मिशमन दल सज्ज असले तरी सोयीसुविधांचा अभाव त्यांच्यासाठी अडसर ठरत आहे.
अग्निशमन दलाची दमछाक! हायराईज व्हेईकलअभावी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी

मुंबई : गोरेगाव पश्चिम गोविंदजी श्रॉफ मार्गावर असलेल्या तळ अधिक २७ मजली टॉवरच्या २५व्या आणि २६व्या मजल्यावर भीषण आगीची घटना घडली होती. यावेळी अग्निशमन दलाकडे हायराईज व्हेईकल उपलब्ध नसल्याने वेळीच पाण्याचा मारा करणे शक्य झाले नाही. मुंबई अग्निशमन दलात फक्त एकच हायराईज व्हेईकल असून ती २०० मीटरपर्यंत पोहोचते. सध्या ही दादर फायर स्टेशनमध्ये तैनात आहे. पूर्व व पश्चिम उपनगरात हायराईज व्हेईकल तैनात असल्यास हायराईज इमारतीत अग्निभडका उडाल्यास वेळीच पाण्याचा मारा करणे शक्य होईल, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

मुंबईत आगीच्या घटना लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच आता उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्याने हे प्रमाण अधिकच वाढणार आहे. परिणामी या सर्वांवर मात करण्यासाठी मुंबई अग्मिशमन दल सज्ज असले तरी सोयीसुविधांचा अभाव त्यांच्यासाठी अडसर ठरत आहे. त्यामुळे जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते. गल्लीबोळातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर बाईक उपलब्ध आहेत. फायर स्टेशनच्या संख्येत वाढ केली जात आहे. मात्र मुंबईत हायराईज इमारती उभ्या होत असताना त्या इमारतीत आगीची घटना घडल्यास मुंबई अग्निशमन दलाकडे आगीवर नियंत्रण मिळवणारी पुरेशी यंत्रणा आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे. मुंबईत गगनचुंबी इमारती उभ्या करण्याची जणू शर्यतच लागली आहे. परंतु हायराईज इमारतीच्या अखेरच्या मजल्यावर पिण्याचे पाणी पोहोचेल का? वीजपुरवठा खंडित झाल्यास काय उपाययोजना? आग लागल्यास काही उपाययोजना याकडे दुर्लक्ष केले जाते. हायराईज इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा असली तरी अनेक घटनांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा ठप्प असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे मत अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आले.

दादरमध्ये एकच व्हेईकल उपलब्ध

अग्निशमन दलाकडे दादर फायर स्टेशनमध्ये एकच हायराईज व्हेईकल आहे. दोन्ही उपनगरात हायराईज व्हेईकल असणे गरजेचे आहे. पुढील काही महिन्यांत हायराईज व्हेईकल अग्निशमन दलाच्या ताफ्यात सामील होतील, अशी अपेक्षा आहे. मुंबईत गगनचुंबी इमारती उभ्या होत असताना अग्निशमन दल अधिक सक्षम करणे काळाची गरज आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in