मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी

गणेशोत्सव काळाप्रमाणे शिमगोत्सव काळामध्ये अवजड वाहतूक बंद न केल्याने या ठिकाणी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, एसटी आणि खासगी बसेस तसेच अवजड वाहतूकही एकाचवेळी रस्त्यावर मंदगतीने कोकणाच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी

शैलेश पालकर/ पोलादपूर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने कोकणात शिमगोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा शिमग्याआधीच सरकारच्या नावाने शिमगा सुरू झाला आहे.

वडखळ, नागोठणे ते पालीफाटा वाकणदरम्यान रस्त्याची दुरवस्था आणि पुढे इंदापूर तसेच माणगांव टाळण्यासाठी बासपास रोडचे काम पूर्ण करण्यासंदर्भात एनएचएआय आणि राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षम्य हेळसांड केल्याने होळीसाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनचालकांना वेळोवेळी आपल्या वाहनांना ब्रेक लावावा लागत आहे. पोलादपूर शहरातील अंडरपास महामार्गावरील विद्युत प्रकाश योजना ऐन शिमगोत्सवाच्या काळामध्ये बंद असल्याने या रस्त्यावर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईकडून गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी पनवेलनंतर पळस्पे, पेणपूर्वी रामवाडीपर्यंत त्यानंतर वडखळपासून नागोठणेपर्यंत तसेच कोलाडपासून इंदापूरपर्यंत चौपदरीकरण झालेले असले तरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. कोलाडमध्ये रोहे फाटा व पुढे सुतारवाडी फाट्याजवळ महामार्गाची अक्षरश: चाळण झालेली दिसून येत आहे. काही ठिकाणी डांबराचे ठिगळ लावून तात्पुरती खड्डे बुजवण्याचे प्रकार करण्यात आले असले तरी चाकरमान्यांचा प्रवास धक्के खात सुरू आहे.

गणेशोत्सव काळाप्रमाणे शिमगोत्सव काळामध्ये अवजड वाहतूक बंद न केल्याने या ठिकाणी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, एसटी आणि खासगी बसेस तसेच अवजड वाहतूकही एकाचवेळी रस्त्यावर मंदगतीने कोकणाच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याचे दिसून येत आहे. कोलाड सोडल्यानंतर इंदापूरला बासपास रोडचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू होऊनही पूर्णत्वास गेले नसल्याचे दिसून येत आहे. तळा तालुक्याकडे जाणाऱ्या वाहनांमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा दिसून येत आहे, तर त्यानंतर माणगांव शहरामध्ये रोड डिव्हायडर लावूनही वाहनांच्या दाटीमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अशातच मोर्बा रोड, काळ नदीवरील पुलाजवळ आणि लोणशी फाटा रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी दिसून आली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी कोकण रेल्वेचा वापर शिमगोत्सवात होत असूनही महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. होळीचा सण आणि शिमग्याचा आनंद घेण्यासाठी कोकणी माणूस मोठ्या प्रमाणावर जात आहे. तथापि, मुंबई-गोवा महामार्गावरील गैरसोयी पाहून तो गावी पोहोचण्याआधीच सरकारच्या नावाने शिमगा करीत आहे.

कोकण रेल्वे हाऊसफुल्ल

होळीच्या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. या गाड्यांची प्रतीक्षा यादी चारशेवर गेली आहे. त्यामुळे रेल्वेने तिकीट देणे थांबविले आहे. शनिवार, रविवार व सोमवार सलग सुट्ट्या आल्याने चाकरमानी कोकणाच्या दिशेने निघाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in