दुसऱ्या दिवशीही मेगाहाल; मोटरमेनच्या अघोषित आंदोलनामुळे स्थानकांवर गर्दीच गर्दी

सीएसएमटी रेल्वे स्थानकात पोहचल्यावर काही प्रवाशांनी गोंधळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी स्टेशन मॅनेजरची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशीही मेगाहाल; मोटरमेनच्या अघोषित आंदोलनामुळे स्थानकांवर गर्दीच गर्दी

मुंबई : मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या अपघाती मृत्यूनंतर मध्य रेल्वेचे मोटरमेन संतापले आहेत. शनिवारनंतर रविवारीही मध्य रेल्वेच्या मोटरमेनचे अघोषित आंदोलन सुरू होते. रविवारचा मेगाब्लॉक असतानाच या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा आणखीच विस्कळीत झाली. त्याचा फटका मध्य रेल्वेच्या सर्व प्रवाशांना बसला. कल्याणपासून भायखळ्यापर्यंत सर्वच रेल्वे स्थानके प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरली होती. नेहमीप्रमाणे रेल्वेच्या ‘लेट’ चालण्याचे कारण दिले जात नव्हते.

रविवारी ‘मेगाब्लॉक’ असल्याने गाड्या विलंबाने धावतात, असा सर्वांचाच अनुभव आहे. त्यामुळे प्रवासीही ‘मेगाब्लॉक’मुळे १० ते १५ मिनिटे गाडी उशिराने धावणार हे गृहित धरतात. रविवारी मात्र कल्याण-सीएसएमटी जलदगती मार्गावर दुपारच्या सुमारास लोकल तब्बल तास ते दीड तास उशिराने धावत होत्या. डोंबिवलीवरून २.४४ वाजता सुटणारी गाडी ३.१५ वाजण्याच्या सुमारास भांडुप ते कांजुरमार्ग स्थानकादरम्यान थांबली. गाडी आता सुटेल, मग सुटेल, असे म्हणता म्हणता तब्बल ४.१५ वाजता हलली. तासभर प्रवासी गाडी कधी निघणार याची वाट पाहत होते. यावेळी फिरायला निघालेल्या स्त्रिया, लहान मुलांचे मोठे हाल झाले, तर कामावर निघालेल्या ‘नोकरदारां’ना पुन्हा ‘लेटमार्क’ खुणवत होता. सर्वात संतापाची बाब म्हणजे लोकलमध्ये स्पीकर असतानाही मोटरमनकडून गाडी का थांबली आहे? याचे कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. काही अतिउत्साही प्रवासी लोकलमधून उतरून रेल्वे मार्गातून चालत होते. त्यांना अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, तर काही जणांनी कडक उन्हात रेल्वे मार्गातून चालण्यास सुरुवात केली.

रेल्वेचे कर्मचारी लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यात बसले होते. त्यांना ड्युटीवर जायचे होते. पण, लोकल का थांबली आहे, याचे उत्तर मिळत नसल्याने तेही कातावले होते. कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, परळ ही रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने ओसांडून वाहत होती. प्रत्येक प्रवासी लोकलची वाट पाहत होते. पण, ती येत नसल्याने ते चरफडत होते. त्यातच उन्हाने गरम होत असल्याने ते हैराण झाले होते. काही प्रवाशांनी रेल्वेच्या १३९ क्रमांकावर फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा भ्रमनिरास झाला. या क्रमांकावर उपनगरीय लोकलची माहिती मिळणार नाही, असे हेल्पलाईनवरून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांचा भायखळा ते सँडहर्स्ट रोडदरम्यान रेल्वे मार्ग ओलांडताना मृत्यू झाला. शर्मा यांच्याकडून रेल्वेचा सिग्नल तोडला गेला. त्यामुळे त्यांच्यावर रेल्वे प्रशासनाकडून कठोर कारवाईची शक्यता होती.

आमचा भाऊ गेल्याचे दु:ख म्हणून आंदोलन

सीएसएमटी रेल्वे स्थानकात पोहचल्यावर काही प्रवाशांनी गोंधळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी स्टेशन मॅनेजरची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण ते उपस्थित नव्हते. तेथे बसलेल्या एका मोटरमनने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मोटरमन मुरलीधर शर्मा हे आमचे सहकारी होते. ते आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे होते. त्याचे दु:ख म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. तुमच्या घरातील कोणी सदस्य गेला असता तर तुम्ही काय केले असते? आमच्या आंदोलनाची नोंद वरिष्ठांनी घेतली आहे. त्यामुळे आम्ही सबुरीचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामी रविवारी सायंकाळी लोकल सेवा पूर्ववत होऊ शकेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in