
पावसाळ्यापूर्वी ७८ टक्के नालेसफाई पूर्ण झाली, असा दावा पालिका प्रशासन व सत्ताधारी करत आहेत; मात्र भाजपच्या नगरसेवकांनी नालेसफाईची पहाणी केली असता आतापर्यंत ३५ केवळ टक्केच नालेसफाई झाल्याचा दावा भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी केला. पालिका प्रशासनाची ७५ टक्के आकडेवारी ही रतन खत्रीची आकडेवारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपने नालेसफाईच्या कामाची पहाणी केली. त्यावेळी शिवसेना नेते म्हणत होते, पहाणी करण्याची इतकी घाई कशाला. यंदा मुंबईची तुंबई झाली तर त्याला पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेना जबाबदार असेल. नियोजनशून्य कारभारामुळे मुंबई असुरक्षित करण्याचा डाव मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचा आहे, असा आरोपही शेलार यांनी यावेळी केला. नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांसह नेत्यांनी नालेसफाईच्या कामाची पहाणी करण्यास सुरुवात केली. भाजपने नालेसफाईच्या कामाची पहाणी करण्यास सुरुवात केली त्याचवेळी नालेसफाई ३१ मे पूर्वी होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत आयुक्तांची भेट घेत वस्तुस्थिती मांडली आणि आयुक्तांनी पहाणी केली होती.
सोमवार १८ व मंगळवार १९ मे रोजी नालेसफाईच्या कामाची पहाणी केली असता नाल्यातील गाळ नाल्यात असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे ७८ टक्के नालेसफाई झाली हा आकडा रतन खत्रीचा आहे का, असा सवाल शेलार यांनी यावेळी उपस्थित करत यंदा मुंबई तुंबली तर त्याला पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेना जबाबदार असेल, असा आरोप शेलार यांनी यावेळी केला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रस्ते कामे व नालेसफाईच्या कामाची रात्रीची पहाणी केली याचा अर्थ उजेडात पुण्य अंधारात पाप. अंधारात आदित्य ठाकरे काय करत होते, असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले पाहिजे, असेही शेलार यावेळी म्हणाले. नालेसफाई म्हणजे हात की सफाई असून हात म्हटले तर काँग्रेसला राग येईल आणि ३५ टक्के नालेसफाई म्हटले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला झोंबेल; मात्र यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई झाली तर त्याला आदित्य ठाकरे व नाना पाटोले जबाबदार असतील, अशी टीका शेलार यांनी केली.