अवकाळी पावसामुळे टोमॅटोचे दर ६० रुपये प्रतिकिलो

अवकाळी पावसामुळे टोमॅटोचे दर ६० रुपये प्रतिकिलो

अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांश भागातून येणाऱ्या टोमॅटोची आवक घटली आहे. पुरवठा घटल्याने नवी मुंबईतील वाशी एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटोचे दर ३० ते ४५ रुपये प्रतिकिलो एवढे झाले आहेत. तर किरकोळ बाजारात पुन्हा टोमॅटो ६० रुपये प्रतिकिलोने विक्री केला जात आहे. दरम्यान, दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक टोमॅटो महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

मागील आठवड्यापासून भाजीपाल्यांच्या दरात कमालीचे चढ-उतार दिसून येत आहेत. गवारीसहित कारली, वांगी या भाज्यांचे दर उतरत असताना गेल्या १० दिवसांत टोमॅटोचे भाव किरकोळ आणि घाऊक बाजारात दुपटीने वाढले आहेत. सध्या टोमॅटोची किरकोळ बाजारातील खरेदी किंमत ६० ते ७० रुपये प्रतिकिलो असून एपीएमसीमध्ये टोमॅटोची सरासरी खरेदी किंमत ३० ते ४५ रुपये प्रतिकिलो एवढी आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत १५ ते १७ टेम्पो टोमॅटोने भरलेले बाजारात येत आहेत. इतर वेळी याच गाड्यांची संख्या जवळपास ४० ते ५० गाड्या एवढी असते. मात्र आवक घटल्याने सामान्य पुरवठ्यापेक्षा सुमारे २५ टक्के कमी माल बाजारात येत असल्याचे व्यापारी बबन पिंगळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी जुनी झाडे काढून टाकत चांगल्या उत्पादनासाठी नवीन लागवड करणे आवश्यक आहे. दरवर्षी या काळात पुरवठ्यात घट होते. परिणामी किंमत वाढू लागते. ताजे पीक येण्यास वेळ लागणार असल्याने आणि बाजारात मालाची थोडीशी आवक होणार असल्याने किमतीत वाढ होते हे सत्य आहे.

- किसन ताजणे, भाजीपाला व्यापारी, एपीएमसी मार्केट, नवी मुंबई

logo
marathi.freepressjournal.in