काचा फोडून कारमधील सामान चोरी करणाऱ्या दुकलीस अटक

२२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले
काचा फोडून कारमधील सामान चोरी करणाऱ्या दुकलीस अटक

मुंबई : रस्त्यावर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील सामान चोरी करणाऱ्या एका दुकलीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. शेरा सबरु चौहाण, सरफुद्दीन अब्दुल रशीद शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या अटकेने चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आकाश धवण सोमानी यांनी फेब्रुवारी महिन्यांत त्यांची कार बोरिवलीतील न्यू लिंक रोड, दुर्गा गार्डनजवळ पार्क केली होती. या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर त्यांच्या निदर्शनास येताच आकाश सोमानी यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या शेरा चौहाण याला नाशिकच्या कसारा, सप्तश्री हॉस्टेलमधून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानेच ही चोरी केल्याचे कबुल केले.

तपासात शेरा हा त्याचा मित्र विनोद पवार याच्यासोबत बाईकवरुन रेकी करुन पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील सामानाची चोरी करत असल्याचे उघडकीस आले होते. अशा प्रकारे गुन्हे करणारा शेरा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यातून अठराहून अधिक चोरीसह घरफोडी, फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले. गेल्या काही वर्षांत त्याने मुंबईसह ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबईतील विविध परिसरातून चोरी केल्याचे उघडकीस आले. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तीस तर इतर शहरात ४० हून अधिक गुन्ह्यांची नोंद असून या सर्व गुन्ह्यांत तो पाहिजे आरोपी आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांतील बाईक पोलिसांनी जप्त केली आहे.

चोरीचे सामान तो मुंबईतील चारबाजारासह अहमदाबाद येथे विक्री करत असल्याचे उघडकीस आले आहे. चालू वर्षांत त्याने एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा गुन्हे केल्याची कबुली दिली असून या सहाही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दुसर्‍या गुन्ह्यांत सरफुद्दीन अब्दुल रशीद शेख या आरोपीस पोलिसांनी अटक केली. सरफुद्दीन हा लग्न समारंभ हॉलबाहेर रस्त्यावर पार्क केलेल्या कारचे काचा फोडून सामान चोरी करत होता. त्याच्याविरुद्ध २२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in