२४ तासांत राजकीय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज हटवा! अन्यथा....; आचारसंहितेची कडक अंमलबजावणी

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी; नामफलक, कोनशिला झाकून ठेवा, अन्यथा पोलिसांत तक्रार
२४ तासांत राजकीय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज हटवा! अन्यथा....; आचारसंहितेची कडक अंमलबजावणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात आचार संहितेच्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी, खासगी ठिकाणी राजकीय पोस्टर्स, बॅनर्स तसेच २४ तासांत होर्डिंग्ज हटवा, असे सक्त आदेश पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नामफलक, कोनशिला झाकून ठेवा, असे आदेश देत आचारसंहितेचे पालन करण्यात दिरंगाई, कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा चहल यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या २५ वॉर्डात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागात कोणत्याही प्रकारचे विशेषत: राजकीय होर्डिंग, बॅनर, पोस्टर दिसणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुढील २४ तासांमध्ये सर्व होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर काढून टाकावेत. तसेच, ते पुन्हा लावले जाणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी वारंवार पाहणी करावी. सार्वजनिक मालमत्ता अधिनियमानुसार पोलिसांत तक्रार दाखल करावी. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमांच्या अधीन राहून होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यासाठी सर्व २५ विभागांच्या कार्यालयात एकल खिडकी प्रक्रिया (सिंगल विंडो सिस्टिम) सुरू करावी. त्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देशही आयुक्त डॉ. चहल यांनी दिले. महानगरपालिकेच्या वतीने सहआयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) तथा संपर्क अधिकारी (मागासवर्ग कक्ष) विजय बालमवार हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील, असेही डॉ. चहल यांनी यावेळी सांगितले.

दोन दिवसांत १२ हजार पोस्टर्स, बॅनर्स हटवले!

दरम्यान, मुंबई उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये १२ हजार ३०० होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर आदी काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. आदर्श आचारसंहितेचे पालन व त्यातील कार्यवाही याबाबत सोमवारी आयोजित बैठकीत डॉ. चहल बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) संजय यादव, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सर्व सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व प्रमुख अभियंता, संचालक यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in