मुंबई : दसरा म्हणजे अश्विन शुद्ध दशमी. दसरा हा सण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू धर्मातील साडे तीन मुहूर्तामधील एक मुहूर्त. दसरा हा शुभ मुहूर्त असल्याने नवनवीन वस्तू खरेदी, गृह खरेदी व कार खरेदी व सोने खरेदीला अमाप उत्साह येतो. यंदा असाच बाजारात उत्साह दिसून येत आहे.
आपल्या नवीन उद्योगाची सुरुवात दसऱ्यापासुन करतात. नवनवीन वस्तू घेऊन त्याची पूजा केली जाते. शस्त्रांची पुजा करण्याचा देखील प्रघात आहे. सरस्वती पुजन या शुभमुहुर्तावर करतात. या दिवशी सीमोल्लंघन, सरस्वती पुजन, शमीपुजन, शस्त्रांचे पुजन आणि अपराजिता पुजन केले जाते.
नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुंबई, ठाणे शहरात नागरिकांनी जोरदार खरेदी केली. दसऱ्याला गोड पदार्थ, नवीन कपडे, साड्या, दागिने, वाहने खरेदी केली जाते. मुंबईत दादर, घाटकोपर, मुलुंड, गिरगाव या मराठमोळ्या भागात उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. दसऱ्याला घरोघरी झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. हे तोरण खरेदी करायला बाजारात गर्दी होती. दसऱ्याला सायंकाळी सोने लुटण्याची परंपरा आहे. घराघरात एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून देण्याची प्रथा आवर्जून पाळली जाते. लहान मुलांसह आबालवृद्ध एकमेकांना सोने देतात.
दसरा सणाला फार मोठी परंपरा आहे. याच दिवशी देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला होता. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणाचा वध करायला निघाले होते. पांडव ही अज्ञातवासात राहायला गेले होते. तेव्हा त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी ती शस्त्रे परत घेतली. त्या झाडाची पूजा केली तोच हाच दिवस.
या सणाच्या दिवशी लोक नवनवीन वस्तू खरेदी, किंवा नवीन योजनेचा प्रारंभ करतात. या दिवशी घराघरात पंचपक्वान्ने बनवली जातात. आपल्या व्यवसायातील रोज वापरात येणाऱ्या वस्तू तसेच घरातील साहित्य व शस्त्रांची पूजा केली जाते.
दसरा ह्या सण च्या दिवशी चोहीकडे आंदीमय वातावरण असते, दसरा हा सण आपल्या एक शिकवण देतो ते म्हणजे चांगल्या गुणांचा नेहमी विजय होत असतो.
सोने खरेदीचा शुभमुहूर्त
यंदा शेअर बाजार गडगडल्याने व जागतिक अस्थिरता निर्माण झाल्याने सुरक्षिततेसाठी अनेकांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवला आहे. त्यामुळे दसऱ्याला मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी होण्याची दाट शक्यता आहे. दसऱ्याला किमान एक ग्रॅम तरी सोने घेण्याची परंपरा अजूनही पाळली जाते.