दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार;शिवसेना आक्रमक

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात यंदाचा दसरा मेळावा कुणाचा शिवसेनेचा की शिंदे गटाचा, यावर राजकीय घमासान सुरू आहे
दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार;शिवसेना आक्रमक

दसरा मेळावा परवानगीसाठी अर्ज करून महिना होत आला तरी निर्णय नाही, याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी जी उत्तर विभाग गाठला; मात्र विधी विभागाकडून अभिप्राय आला नसल्याचे वैद्य यांना सांगण्यात आल्याने परवानगी मिळो अथवा न मिळो, दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर शिवाजी पार्क मैदान परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, दसरा मेळावा परवानगी देण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात यंदाचा दसरा मेळावा कुणाचा शिवसेनेचा की शिंदे गटाचा, यावर राजकीय घमासान सुरू आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गटानेही अर्ज केला आहे. शिवसेनेने सर्वात आधी पालिकेकडे मेळावा परवानगीसाठी अर्ज केला आहे. यादरम्यान बीकेसीच्या मैदानासाठीही शिवसेना व शिंदे गटाने अर्ज केला होता. येथे शिंदे गटाला एमएमआरडीएने परवानगी दिली आहे. शिवसेनेने मागितलेले मैदान एका कंपनीसाठी आधीच आरक्षित केल्याने शिवसेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेने दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेने परवानगीसाठी एकदा अर्ज व त्यानंतर स्मरणपत्र असे दोन वेळा अर्ज केले आहे. महिना उलटला तरी पालिकेच्या जी- नॉर्थ कार्यालयाने याबाबत निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या आधी दोन वेळा भेट घेतली. त्यावेळी यावर विधी विभागाचा अभिप्राय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले; मात्र अजूनही याबाबत काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मंगळवारी शिवसेना नेते मिलिंद वैद्य यांनी शिष्टमंडळांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. विधी खात्याकडून आजपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याने कोणत्या गटाला परवानगी द्यायची याबाबत ठरवता येणार नाही. विधी विभागाने अभिप्राय दिल्यानंतर कळवले जाईल, असे प्रशासनाकडून शिष्टमंडळाला सांगण्यात आल्याचे वैद्य यांनी सांगितले. त्यामुळे परवानगी मिळो वा ना मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी मेळाव्यासाठी शिवसैनिक जमा होतील, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. आता प्रशासनाने ठरवायचे की, परवानगी द्यायची किंवा नाही, आमचा निर्णय ठरला आहे, शिवसेना शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेणारच, असेही ते म्हणाले.

शिवाजी पार्कवर ठाकरेंनाच परवानगी मिळावी - अजित पवार

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांनाच मिळावी, असे अजित पवार म्हणाले. ‘‘दसरा मेळाव्यासाठी अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रयत्न करावा. वास्तविक शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवाजी पार्कमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झाला आणि त्यानंतर बाळासाहेबांनी ती जबाबदारी दसरा मेळाव्यातच उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षप्रमुख म्हणून सोपवली होती.

शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे हे करतील, असे बाळासाहेबांनी जाहीर केले होते. आता बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाला मेळावा घ्यायला परवानगी मिळाली आहे, तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांना परवानगी द्यायला हवी. दोन्ही मेळावे व्हावेत आणि दोघांचे विचार राज्याने ऐकावेत,” असेही अजित पवार म्हणाले.

राज्य सरकारचा पालिकेवर दबाव

मेळाव्याला परवानगी मिळू नये, यासाठी राज्य सरकारचा पालिकेवर दबाब आहे.

एक महिन्याचा कालावधी झाला तरी यावर कोणताही निर्णय झालेला नाही. शिंदे गटाने बीकेसीसाठी परवानगी मागितली होती, त्यांना मिळाली. त्या ठिकाणी त्यांनी पैसेही भरले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटाने अर्ज केला असता तर त्याचा विचार केला गेला असता; पण आता तोही प्रश्न उरला नाही. या मेळाव्याला परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगितले जाते आहे; पण त्याचा इथे काहीही संबंध नाही, असे मिलिंद वैद्य यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in