एसटी भरतीतील उमेदवारांना राज्य सरकारकडून दसऱ्याची भेट

एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे
एसटी भरतीतील उमेदवारांना राज्य सरकारकडून दसऱ्याची भेट

एसटीतील २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदाच्या भरतीतील पात्र पुरूष व महिला उमेदवारांना राज्य सरकारने दसऱ्याची भेट दिली आहे. या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमदेवारांना नेमणूकीचे, तर २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य परिवहन महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील १४३१ पात्र उमेदवारांना यापूर्वीच नेमणूक देण्यात आली आहे; मात्र गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे रखडलेल्या उर्वरीत पात्र उमेदवारांच्या नेमणूकीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार मंत्रालयात मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खानिकर्म मंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच विविध विभागाचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महिलाही करणार एसटीचे सारथ्य

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने राबविलेल्या भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागविले होते. यामध्ये २०३ महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून १४२ महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे.

यापैकी २२ महिला उमेदवारांना मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवापूर्व प्रक्षिणाचे पत्र देण्यात आले. ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचे सारथ्य करण्यास सज्ज होणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in