‘वायुविजन प्रणाली’मुळे बोगद्यात काम करणे सोपे

मुंबई विभागातील अभियंत्यांनी बोगद्यांमध्ये मोबाइल वायुविजन प्रणाली (मोबाइल व्हेंटिलेशन सिस्टीम) उपलब्ध करून देण्यात आली आहे
‘वायुविजन प्रणाली’मुळे बोगद्यात काम करणे सोपे

मुंबईहून दिल्लीला रेल्वेमार्गाने जाण्यासाठी तीव्र चढ-उताराचे घाट पार करावे लागतात. कसारा-इगतपुरी रेल्वेमार्गादरम्यान तब्बल १८ बोगदे आहेत. मात्र, यापैकी एकाही बोगद्यात हवा खेळती राहण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने रुळांच्या दुरुस्तीचे काम करताना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागतात. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अभियंत्यांनी बोगद्यांमध्ये मोबाइल वायुविजन प्रणाली (मोबाइल व्हेंटिलेशन सिस्टीम) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

घाट मार्गावर काम करत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येतात. घाटात काम करताना 'ओएचई'मधील वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याने काम करण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर अनिवार्य असतो. डिझेल इंजिनमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. यामुळे घाटात काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना, लोकोपायलटला डोळे जळजळणे, दृष्टी अंधूक होणे आदींचा त्रास सहन करावा लागतो.

यंत्रणा काय काम करणार?

बोगद्यात काम करताना एकावेळी चार डिझेल इंजिन सुरू ठेवावी लागतात. यामुळे प्रचंड धूर निर्माण होतो. हा धूर वेगाने बाहेर काढणे आणि बोगद्यातील हवा खेळती राहण्यासाठी आवश्यक असते. अन्यथा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक शारीरिक व्याधींचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी मध्य रेल्वेकडून एक यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. रेल्वे अभियंत्यांनी मोबाइल वायुविजन प्रणाली विकसित केली आहे. मोबाइल वायुविजन प्रणाली ही पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेली आहे. वजनाने अत्यंत हलकी असणारी ही प्रणाली सहज कुठेही घेऊन जाणे शक्य आहे. इगतपुरी घाटात याचा यशस्वीपणे वापर करण्यात आला. २१५ व्होल्ट सिंगल फेज आणि ४१५ व्होल्ट थ्री फेज एवढा विद्युत पुरवठा या यंत्रणेतून होत आहे. तर प्रतितास २०५० ते ९० हजार क्युबिक मीटर हवा बाहेर फेकण्याचा वेग या यंत्रणेचा असल्याने याचा मोठा फायदा घाट मार्गात काम करताना होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in