इबोलाच्या धोक्यामुळे मुंबई पालिका अलर्ट मोडवर; निवासी डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी

आफ्रिकेतील काँगो आणि शेजारील युगांडा भागात इबोला विषाणुचा प्रसार झाला आहे. भारतात या विषाणुचा प्रसार झाला नसला तरी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हात स्वच्छ धुवावेत, बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करावे, आदी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
इबोलाच्या धोक्यामुळे मुंबई पालिका अलर्ट मोडवर; निवासी डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी
इबोलाच्या धोक्यामुळे मुंबई पालिका अलर्ट मोडवर; निवासी डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : आफ्रिकेतील काँगो आणि शेजारील युगांडा भागात इबोला विषाणुचा प्रसार झाला आहे. भारतात या विषाणुचा प्रसार झाला नसला तरी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हात स्वच्छ धुवावेत, बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करावे, आदी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या नायर, केईएम, सायन व कूपर या चारही मेडिकल कॉलेजमध्येही मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आफ्रिकेतील काही भागांमध्ये सुरू असलेल्या इबोला उद्रेकाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या ‘मार्ड’तर्फे मुंबईतील सर्व पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सध्या हा उद्रेक इबोला विषाणूच्या बुंडीबुग्यो प्रकाराशी संबंधित असून त्याचा प्रसार प्रामुख्याने काँगो आणि शेजारील युगांडा या भागांपुरता मर्यादित आहे. भारतामध्ये सध्या कोणताही इबोलाचा उद्रेक किंवा समुदाय स्तरावरील प्रसार नोंदवलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे पालिकेच्या ‘मार्ड’ संघटनेने स्पष्ट केले आहे.

पालिका रुग्णालयातील ‘मार्ड’ संघटनेअंतर्गत कार्यरत निवासी डॉक्टरांनी नेहमीच कोविडसह विविध आरोग्य आपत्कालीन परिस्थितींमध्ये फ्रंटलाइन हेल्थकेअर वर्कर्स म्हणून समर्पण आणि अत्यंत जबाबदारीने काम केले आहे. त्याचप्रमाणे, भविष्यात आवश्यकतेनुसार रुग्णालय प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना प्रतिबंधात्मक तयारी, व संसर्ग नियंत्रण उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेच्या निवासी संघटनेकडून सांगण्यात आले. इबोला हा प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या रक्त, शारीरिक स्त्राव, उलटी किंवा दूषित वस्तूंशी थेट संपर्कातून पसरतो. हा संसर्ग सामान्य परिस्थितीत हवेतून पसरत नाही तसेच कोविड-१९ इतका सहज संसर्गजन्य नाही, असेही या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

हात स्वच्छ धुवा, बायोमेडिकल कचरा व्यवस्थापनाचे पालन करा

निवासी डॉक्टरांना मानक संसर्ग नियंत्रण पद्धतींचे पालन करणे, योग्य हात स्वच्छता राखणे, सार्वत्रिक प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे, बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करणे तसेच अनावश्यक घबराट टाळून व्यावसायिक तयारी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी जागरूकता, तयारी आणि जबाबदार आरोग्य सेवा पद्धती या अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे पालिकेच्या ‘मार्ड’ संघटनेने नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in