'इको बायो ट्रॅप' ने डेंग्यूचा खात्मा; अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अळ्या नष्ट करणार

डासांच्या उत्पत्तीवर रोख
'इको बायो ट्रॅप' ने डेंग्यूचा खात्मा; अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अळ्या नष्ट करणार

मुंबई : पावसाळ्यात डोकेदुखी ठरणाऱ्या डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचा कीटक नाशक विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 'इको बायो ट्रॅप' या तंत्रज्ञानाचा वापरामुळे डेंग्यूचा प्रसार होण्याआधीच खात्मा होणार आहे. स्वच्छ पाणी, कुंड्या याठिकाणी 'इको बायो ट्रॅप' तंत्रज्ञान डासांची अंडी नष्ट करणार आहे. यामुळे डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांच्या उत्पत्ती रोखली जाणार, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेचा कीटकनाशक विभाग व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. तरीदेखील डासांमुळे साथीचे आजार पसरण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्यात हे प्रमाण सर्वाधिक असते. मलेरियाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अँनोफिलीस व डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी कीटक नाशक विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जातात; मात्र 'इको बायो ट्रॅप' तंत्रज्ञानामुळे डेंग्यूचा खात्मा केला जाणार आहे.

वरळीतून 'इको बायो ट्रॅप' तंत्रज्ञानाचा वापर!

'इको बायो ट्रॅप' उपक्रम प्रायोगित तत्त्वावर जी/उत्तर वरळी विभागातून राबवण्यास सुरुवात होणार आहे. यानुसार कुंभारवाडा, अण्णा नगर/मुस्लीम नगर, धारावी बस आगार, राजीव गांधी सरकारी क्रीडा संकुल, धारावी, माहीम फाटक, सोचपल व इंदू मिल आवार, गोखले मार्ग, भवानी शंकर महापालिका शाळा, दादर अशा ठिकाणांवर १८ ठिकाणी या कुंड्या बसवण्यात येणार आहेत. हा उपक्रम उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये वापरता येणार आहे. ‘स्टार्ट अप’ अंतर्गत महापालिकेच्या स्माईल कौन्सिल या बिझनेस इन्क्युबेशन सेंटरच्या मे. इको बायो कन्सलटिंग प्रा. लि. इन्क्युबेटीच्या या उपक्रमासाठी पालिका ३ कोटींचा खर्च करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती प्रशासक यांनी मंजुरी दिली आहे.

डांस आकर्षित अन् अंडी नष्ट होणार!

इको बायो ट्रॅप उपक्रमात डासांची उत्पत्ती होऊ शकणार्‍या संभाव्य ठिकाणी कुंड्या बसवल्या जातील. यामध्ये पाण्यात डास आकर्षित करणारी इन्सेक्ट ग्रोथ पावडर मिक्स केली जाईल. याकडे डास आकर्षित होतील. या ‘आयजीआर’ पावडरमुळे डासांनी अंडी घातली तरी ती नष्ट होतील. त्यापासून उडणारे डास निर्माण होऊ शकणार नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in