

विशेष प्रतिनिधी/मुंबई
'द फ्री प्रेस जर्नल' (एफपीजे) आणि 'नवशक्ति' यांच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी 'इको-गणेशा मुंबई महापौर पुरस्कार' स्पर्धेच्या ७ व्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईकरांना शाश्वत आणि निसर्गपूरक गणेशोत्सव साजरा करून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत 'वैयक्तिक घरगुती गणपती' आणि 'गृहनिर्माण संस्था' (हाऊसिंग सोसायटी) अशा दोन श्रेणींमध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत.
नामवंत सेलिब्रिटींच्या परीक्षकांद्वारे प्रत्येक श्रेणीतून २० विजेत्यांची निवड केली जाईल तर एका विशेष विजेत्याला 'मेयर चॉईस अवॉर्ड' (मुंबई महापौर पुरस्कार) प्रदान करण्यात येईल.
स्पर्धेत असे व्हा सहभागी
पर्यावरणपूरक मूर्ती आणि शाश्वत/नैसर्गिक सजावटीसह गणेशोत्सव साजरा करा. तुमच्या बाप्पाच्या आणि सजावटीचे जास्तीत जास्त दोन फोटो काढा. अर्जाची लिंक मिळवण्यासाठी ७७१८००८०३७ या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर "FPJ Eco Ganesha" असा संदेश (Message) पाठवा. मिळालेल्या लिंकवर फोटो अपलोड करून आपला अर्ज सबमिट करा. अर्ज करण्याची मुदत १४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ आहे.
बाप्पाचे स्वागत करू या!
निवडण्यात आलेले उत्कृष्ट फोटो 'द फ्री प्रेस जर्नल' आणि 'नवशक्ति' वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केले जातील. मुंबईकरांनी या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे स्वागत करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.