अंमली पदार्थ तस्कर शिराझीवर ED चा गुन्हा ; बनावट कंपन्यांच्या मदतीने बेकायदेशीर निर्यात, ९ लॉजिस्टीक कंपन्यांची स्थापना

या प्रकरणात ‘ईडी’ने अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून यात अभिनेता शिव ठाकरे व बिग बॉस फेम अब्दुल रोझिक यांचाही समावेश होता.
अंमली पदार्थ तस्कर शिराझीवर ED चा गुन्हा ; बनावट कंपन्यांच्या मदतीने बेकायदेशीर निर्यात, ९ लॉजिस्टीक कंपन्यांची स्थापना
Published on

आशिष सिंह/मुंबई

बनावट कंपन्यांचा वापर करून अमली पदार्थांचा मोठा तस्कर अली असगर शिराझी याने बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची परदेशात निर्यात केल्याप्रकरणी ‘ईडी’ने त्याच्याविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शिराझीबरोबरच आरोपपत्रात अमली पदार्थांचा माफिया कैलास राजपूत, दानिश मुल्ला, भावेश पटेल, विजय राणे, मेहरीन शिराफी आणि अन्य व्यक्तींचा समावेश केला आहे. तसेच ह्युस्टलर्स हॉस्पिटॅलिटी, फालिशा व्हेंचर्स यांच्यासह कुरिअर व लॉजिस्टीक कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. विशेष पीएमएलए कोर्टात ४ मार्च रोजी या तक्रारीवर सुनावणी होणार आहे.

या प्रकरणात ‘ईडी’ने अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. यात अभिनेता शिव ठाकरे व बिग बॉस फेम अब्दुल रोझिक यांचाही समावेश होता.

नुकतीच, ईडीने ५.३७ कोटींची चल व अचल संपत्ती जप्त केली. त्यात फ्लॅट, दुकाने व जमीन आदींचा त्यात समावेश होता. ही मालमत्ता शिराझी, त्याची पत्नी मेहरीन, अब्दुल समद, मनोज पटेल, भावेश शहा यांच्या नावावर होती, तर चल संपत्ती ३६.८१ लाख रुपयांची होती. मेसर्स ह्युस्टलर्स हॉस्पिटॅलिटी प्रा. लिमिटेडचे व रामलखन पटेल व शोभा पटेल यांच्या बँक खात्यातील रक्कम जप्त केली.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ईडीने तपासाला सुरुवात केली. यात अमली पदार्थविरोधी कायदा १९८५, औषध व सौंदर्य कायदा १९४० नुसार, शिराझी व अन्य व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले.

तपासात आढळले की, शिराझी व त्याचे साथीदार अनेक लॉजिस्टीक कंपन्या, कॉल सेंटर, वेबसाइट, सल्लागार कंपन्या व बनावट औषध कंपन्या चालवत असल्याचे आढळले. या सर्व कंपन्या अमली पदार्थ भारतातून परदेशात पाठवत असल्याचे आढळले. अमली पदार्थांच्या तस्करीचे नेटवर्क यासाठी वापरले जात होते.

शिराझीला अटक केल्यानंतर मेहरानीच्या मोबाईल फोनचे न्यायवैज्ञक विश्लेषण केल्यानंतर पुरावे गोळा केले. शिराझी याच्या अटकेनंतर मेहरीन व सिद्धी जामदार हे अमली पदार्थांच्या व्यवसायात कार्यरत आहेत. अमली पदार्थ पुरवल्याबद्दल अंगाडियाकडून एक कोटी रुपये मिळाले.

नऊ लॉजिस्टीक कंपन्यांची स्थापना

शिराझीने अमली पदार्थ तस्करीसाठी नऊ कंपन्यांची स्थापना केली होती. या कंपन्यांमार्फत अमली पदार्थ तस्करी व मनी लाँड्रिंग केले जात होते. शिराझी हा अमली पदार्थांचे घटक या लॉजिस्टीक कंपन्यांमार्फत अमेरिका व इंग्लंडला पाठवत होते. राजपूत व त्याचे साथीदार या मालाची डिलिव्हरी घेत होते. त्यानंतर ते युरोपातील विविध देशांत पाठवत होते. विविध सल्लागार कंपन्या व व्यक्तींमार्फत हा निधी भारतात येत होता. शिराझीची कंपनी मेसर्स वन लॉजिस्टीक ही मेसर्स हौसा वर्ल्डवाइड एक्स्प्रेस व एझहिल व चेशियन यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करत असल्याचे ‘ईडी’ला आढळले.

logo
marathi.freepressjournal.in