समीर वानखेडे यांच्याविरोधात ‘ईडी’कडून गुन्हा दाखल

कार्डेलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात ईडीने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली.
समीर वानखेडे यांच्याविरोधात ‘ईडी’कडून गुन्हा दाखल

धर्मेश ठक्कर/मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला. यापूर्वी अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी) व सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत.

यापूर्वी मंगळवारी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने वानखेडे यांनी आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध छळ केल्याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीबाबत पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणाऱ्या ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या वानखेडेंच्या याचिकेवर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली.

अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ खटल्यातून सोडवण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ईडीने गुन्हा नोंदवला. यापूर्वी या प्रकरणात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, समीर वानखेडे व अन्य तीन एनसीबीच्या अधिकाऱ्यांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी केली जाईल.

ईडीने नोंदवलेला गुन्हा हा सीबीआयच्या गुन्ह्यावर अवलंबून आहे. त्याची बॉम्बे हायकोर्टात सुनावणी आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने मी याबाबत काहीही वक्तव्य करणार नाही. मी कोर्टात योग्य वेळी योग्य तो खुलासा करीन. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे वानखेडे म्हणाले.

२ ऑक्टोबर २०२१ मध्ये कार्डेलिया क्रूझमध्ये एनसीबीने छापे मारले होते. त्यात आर्यन खानविरोधात गुन्हा दाखल करून २० जणांना अटक केली होती.सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले.

वानखेडे उच्च न्यायालयात

कार्डेलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात ईडीने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली. वकील करण जैन यांच्यामार्फत हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली. वानखेडे यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी वानखेडे यांच्या वकिलांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in