राजकीय निर्णय ईडी घेतंय!

शरद पवार यांचा आरोप : राष्ट्रवादीच्या फुटीमागे ईडीच कारणीभूत
राजकीय निर्णय ईडी घेतंय!

मुंबई : यापूर्वी कोणताही राजकीय निर्णय राजकीय पक्ष घ्यायचे, पण आता ईडी राजकीय निर्णय घेते आहे. कोणी कोणत्या पक्षात जायचे, हे ईडी ठरवते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटुन गेलेल्या नेत्यांनी फुटीमागे ईडीची कारवाई हे कारण असल्याचे स्पष्ट केल्याचा दावाही पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सहकारी भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी मला भेटून पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं आहे. या आधी कोणताही राजकीय निर्णय हे राजकीय नेते घ्यायचे, पण आता राजकीय निर्णय ईडी ही संस्था घेते, असं आपल्या सहकाऱ्यांनी मला भेटल्यानंतर सांगितलं. ईडी ठरवते कोणत्या पक्षात कोण जायचं ते.’’

अजित पवार यांच्यासोबत पुण्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपने शरद पवार यांना केंद्रात कृषी मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. याबाबत शरद पवार म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते मला माहिती नाही, पण ती जी गुप्त बैठक होती, त्यामध्ये कोणत्याही राजकीय गोष्टीची चर्चा झाली नाही. अजित पवार मला भेटायला आले. आमच्या कुटुंबात एक पद्धत आहे, पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून कुठलाही कौटुंबिक प्रश्न असेल तर…, माझा एक सल्ला घेतला जातो. त्यासाठी कुणी आलं असेल तर त्यावर अधिक काही समजयाचं कारण नाही,’’ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल शरद पवार यांच्यावर टीका झाली होती. याबाबत पवार म्हणाले, “तो कार्यक्रम सहा महिन्यांपूर्वी ठरला होता. या कार्यक्रमाला टिळक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हेदेखील उपस्थित होते. ते कुठल्या पक्षाचे आहेत, ते सर्वांना माहिती आहे. हा कार्यक्रम आयोजित करणारे गृहस्थ मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्याबद्दल चर्चा होत नाही. पण, माझ्याबाबत चर्चा झाली. नाव त्यांनी सूचवलं विनंती केली की, तुम्ही विचारा. मी फोन केला आणि त्यांनी निमंत्रण स्वीकारलं”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

‘‘भाजपनं निवडून आलेली सरकार पाडली. गोव्यातील सरकार केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन पाडलं. मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वात सरकार होतं, ते पाडलं गेलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याची वाट कशी लावली, हे सांगायची गरज नाही. मोदी सरकार समाजात कटुता वाढवतंय. जाती धर्मात अंतर वाढवतंय. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणून आम्ही हा मुद्दा इंडियाच्या बैठकीत मांडू. इंडियाचे जे घटक आहेत, त्यांना याबाबत त्यांच्या राज्यात आक्रमक भूमिका घ्यायला सांगणार आहे, असेही शरद पवार म्हणाले.

फडणवीसही म्हणाले होते, मी पुन्हा येईन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पुढच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला होता. त्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीसांनीही या आधी मी पुन्हा येईन, असे म्हटले होते. ते आले, पण दुसऱ्याच पदावर,’’ असा टोला त्यांनी हाणला. मोदी सरकारच्या अनेक निर्णयांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, आताही जातीय तेढ निर्माण करण्याची मोदी सरकारची भूमिका आहे.

logo
marathi.freepressjournal.in