
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ईडीच्या कार्यपध्दतीवर गंभीर आरोप केले. कुर्ला येथील जमीनीच्या व्यवहारासंबंधीची महत्त्वाची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लपविली असून न्यायालयाची दिशाभूल केली जात असल्याचा दावा करताना अंधेरी उपनिबंधक कार्यालयातून माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीचा दाखलाच न्यायालयात सादर केला.
ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणार्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीच्या तपासात आढळले. त्यानुसार ईडीने कारवाई करत मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. आता मलिक यांनी नव्याने जातीनासाठी अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा केला आहे.
या याचिकेवर विशेष न्यायालयात सुनावणी झाली.
२३ वर्षांनी जाग आली का?
उपनिबंधकांनी दिलेल्या माहिती नुसार मलिक यांनी मालमत्तेबाबत केलेला व्यवहार योग्यच होता. तसेच नवाब मलिक यांना मालमत्ता विकण्यासाठी सरदार खान याने वापरलेली पॉवर ऑफ टर्नी बनावट नव्हती, तर मुनीला प्लम्बरने स्वतःच ती उपनिबंधकांसमोर केली होती. मात्र ईडीने या संबंधी न्यायालयाला अंधारात ठेवले, असा गंभीर आरोप केला.