
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास करणारी प्रमुख यंत्रणा ‘ईडी’च्या फोर्ट परिसरातील कार्यालयात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच ही आग भडकली. त्यामुळे ईडी कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल ७ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
फोर्ट येथील ‘कैसर-ए-हिंद’ या पाच मजली इमारतीत सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कार्यालय आहे. शनिवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमाराला चौथ्या मजल्यावर आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, इमारतीच्या खिडक्या, दरवाजे बंद असल्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले. त्यामुळे अग्निशमन दलाने पहाटे साडेतीन वाजता लेव्हल दोनची आग जाहीर केली, तर सव्वाचार वाजता लेव्हल तीनची आग जाहीर केली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी काचेच्या खिडक्या तोडल्या. त्यामुळे आग आणि धुराची तीव्रता कमी झाली. रविवारी सकाळी तब्बल ७ तासांनी म्हणजे ९ वाजता अग्निशमन दलाने चारही बाजूने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर पावणेबारापर्यंत कुलिंग ऑपरेशन सुरू होते, अशी माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.
आठ इंजिन, ६ जम्बो टँकरने आगीवर नियंत्रण
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची ८ अग्निशमन इंजिन, ६ जम्बो टँकर, १ एरियल वॉटर टॉवर टेंडर, १ ब्रीदिंग ऑपरेट्स व्हॅन, १ वॉटर क्विक रिस्पॉन्स वाहन आणि रुग्णवाहिका असा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. मात्र, व्हरांड्यात मोठ्या प्रमाणात फर्निचर रचून ठेवल्यामुळे तसेच बाल्कनीमुळे आग नियंत्रणात आणण्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. मात्र, जवानांनी तब्बल ७ तास शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली.
धूर, उष्णतेमुळे आगीवर नियंत्रणास विलंब
मध्यरात्री बंद इमारतीत आग लागल्यामुळे चौथ्या मजल्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर आणि उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अनेक अडचणी आल्या. त्यात व्हरांड्यात फर्निचर ठेवलेले होते. मात्र, जवानांनी अथक प्रयत्न करून शेवटी ही आग नियंत्रणात आणली. या आगीचे कारण समजू शकले नाही. याबाबत चौकशी करण्यात येत आहे.